Mulshi Pattern 2 : धडाका होणार! ‘मुळशी पॅटर्न- २’ची अधिकृत घोषणा; ‘या’ टॅगलाईनने वाढवली उत्सुकता
Mulshi Pattern 2 : युवा उद्योजक पुनीत बालन आणि अभिजीत भोसले करणार 'मुळशी पॅटर्न- २' ची निर्मिती; प्रवीण तरडे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर.

Mulshi Pattern 2 – तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट, अशी वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी टॅगलाइन असलेला मुळशी पॅटर्न– २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुळशी पॅटर्नच्या यशानंतर आता मुळशी पॅटर्न – २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजीत भोसले जेन्युन प्रॉडक्शन हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
ग्रामीण भागातील वास्तव, संघर्ष आणि व्यवस्थेतील काळी बाजू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. पुनित बालन, अभिजीत भोसले आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी गुरुवारी या चित्रपटाची घोषणा केली. घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट, अशी टॅगलाइन असल्याने या चित्रपटात नेमकी वाळूच्या संघर्षाची कथा पाहायला मिळणार आहे,
की मुळशी पॅटर्नप्रमाणेच वाळू माफियांच्या वाढते जाळे आणि त्यामागील वास्तव हे पहायला मिळणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या सगळ्या सामाजिक घुसळणीत सामान्य माणसाचे घराचे महाग होत चाललेले स्वप्न यावर, या चित्रपटात भाष्य केले जाणार आहे, याबाबतही तर्क- वितर्क लढवले जात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार असून, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या देऊळ बंद- २ या चित्रपटाचे काम सुरू असल्याने मुळशी पॅटर्न-२ चे काम काहीसे लांबले होते.
मात्र, आता ती प्रतीक्षा संपली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून, तो नेमका कधी प्रदर्शित होणार, याची घोषणा यथावकाश केली जाणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कोणते कलाकार असतील, आधीच्या चित्रपटातील कोणते कलाकार यात पुन्हा दिसतील. कथानकाची दिशा नेमकी काय असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.




