Mulshi News : मुळशी पंचायत समिती आरक्षण जाहीर ; सभापतीपद महिलेकडे, पौड आणि माण गणात रस्सीखेच

प्रभात वृत्तसेवा
पौड – मुळशी पंचायत समितीच्या सहा गणांची आरक्षण सोडत आज पौड येथे पार पडली. हिंजवडी वगळता इतर पाचही गणांमध्ये इच्छूकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने पौड आणि माण गणात रस्सीखेच रंगणार आहे. हिंजवडी गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनेकांच्या सदस्य होण्याच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या. तर पिरंगुट आणि भूगाव हे गण सर्वसाधारणसाठी खुले झाल्याने या भागांतील निवडणूक अधिक रंगणार आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पौड येथील सेनापती बापट सभागृहात झाला. यावेळी उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तहसिलदार विजयकुमार चोबे यांच्या नियंत्रणाखाली सोडत पार पडली. कार्यक्रमाला निवासी नायब तहसिलदार मदन जोगदंड, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच इच्छुक महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिठ्ठ्या काढण्यासाठी पौडच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थिनी – काव्या खर्चन, जान्हवी नळेगावे, आरोही चव्हाण आणि सृष्टी भिलारे यांनी सहभाग घेतला.
तालुक्यात एकूण सहा गण – पौड, अंबडवेट, माण, हिंजवडी, पिरंगुट आणि भूगाव आहेत. अनुसूचित जातीची संख्या सर्वाधिक असल्याने हिंजवडी गण अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव ठेवण्यात आला. अनुसूचित जमातीचे प्रमाण अपेक्षित नसल्याने या प्रवर्गाचे आरक्षण निघाले नाही. मागास प्रवर्गसाठी एकच जागा अंबडवेट गणासाठी चिठ्ठीतून निघाली. तर पौड, माण, पिरंगुट आणि भूगाव हे गण सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाले.
त्यात पौड आणि माण हे दोन्ही गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठरले. सभापतीपदही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या दोन गणांमध्ये स्पर्धा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. पिरंगुट आणि भूगाव हे गण खुले झाल्याने सर्वसाधारण वर्गातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. आरक्षण प्रक्रियेदरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन उपजिल्हाधिकारी खैरनार आणि तहसीलदार चोबे यांनी केले.
आरक्षण खालीलप्रमाणे..
-पौड : सर्वसाधारण महिला
-अंबडवेट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
-माण : सर्वसाधारण महिला
-हिंजवडी : अनुसूचित जाती महिला
-पिरंगुट : सर्वसाधारण
-भूगाव : सर्वसाधारण





