मुळा धरण सायंकाळी सहा वाजता निम्मे भरले; नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

– अनिल देशपांडे
राहुरी : अहिल्यानगर जिल्ह्याची जलदायिनी असलेले २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळाधरण आज सायंकाळी सहा वाजता क्षमतेच्या निम्मे भरले. आज सायंकाळी सहा वाजता धरणात १२९८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. सायंकाळी सहा वाजता कोतूळ येथील आवक ९५४५ क्युसेक आहे.
नगर पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील व शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी ही माहिती दिली. २१ जूलै पासून धरणात पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होत गेली. या पाच दिवसात धरणात तब्बल ३७६२ दशलक्ष घनफूट पाणी साठा वाढल्याने आज सायंकाळी सहा वाजता धरण निम्मे भरले. मुळा लाभक्षेत्रात समाधानी वातावरण आहे.
काल सकाळी दहा वाजता कोतुळ येथील आवक १६ हजार ७५० क्युसेक सुरू होती . दुपारी सव्वा बारा वाजता ही आवक २४४५२ तर सायंकाळी सहा वाजता आवक २५८२८ क्युसेक पर्यंत वाढली. या हंगामातील ही सर्वाधिक आवक होती. मागील ४८ तासात मुळाधरणात ९२२ दशलक्ष घनफूट पाणी सकाळी सहा पर्यंत नवीन पाणी आले.
गतवर्षी १जूलैला मुळाधरणात ८६१७दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. २५ जूलै पर्यंत नव्याने ४९८८ दशलक्ष घनफूट पाणी नवीन आले होते. यंदाच्या १ जूलैला धरणात ५९६३ दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. गतवर्षीच्या तूलनेत तो २६५४ दशलक्ष घनफूट कमी होता. २५ जूलै अखेर धरणात ७०१७ दशलक्ष घनफूट पाणी नवीन आले. आणि यंदा धरण निम्मे भरले.
मागील पाच वर्षात मुळाधरण निम्मे भरले ते दिनांक या प्रमाणे:
२०२३–२४जूलै
२०२२–१५जूलै
२०२१–२६जूलै
२०२०–८आँगस्ट
२०१९–४आँगस्ट
गेल्या दोन दिवसापासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे दमदार हजेरी आहे . हरिश्चंद्रगड कडील पाणलोटात मोठी पर्जन्यवृष्टी सुरू आहे . मुळा धरण साठा बुधवारी सकाळी दहा हजार ६३६दशलक्ष फुटावर ( ४१ टक्के ) पोहोचला होता.तर पाण्याची पातळी १ हजार ७७७.२० इतकी झाली .
काल सायंकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासात धरणात तब्बल पाऊण टीएमसी पाणी जमा झाले होते. आज च्या बारा तासात धरणात १०६५ दशलक्ष घनफूट वाढ झाली. यंदा मुळा धरण या सप्ताहात पाणी साठ्यात अशी वाढ होत गेली.सकाळी सहा वाजता मुळा धरणातील पाणी साठा असा होता. दशलक्ष घनफूट मध्ये.
२१जूलै…९२१८
२२जूलै…९४२०
२३जूलै…९९५६
२४जूलै…१०६३६
२५जूलै…११९१५
सायंकाळी…१२९८०





