Muhammad Yunus : बांगलादेशातील इन्किलाब मंचचा नेता शरिफ उस्मान हादी याच्या हत्येच्या निष्पक्ष आणि पारदर्शक तपासासाठी बांगलादेशातील डॉ. मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारने संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क विषयक कार्यालयाला सहकार्याचे आवाहन केले आहे. आवामी लीग सरकारविरोधातल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हादी याची १२ डिसेंबर रोजी गोळ्या गालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे व्हावा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करणारे पत्र शुक्रवारी जिनिव्हा येथील बांगलादेशच्या स्थायी मिशनने मानवाधिकार उच्चायुक्तांच्या कार्यालयाला पाठवले आहे, असे मुख्य सल्लागारांच्या कार्यालयाने शनिवारी सांगितले. हादीच्या हत्येला जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून शिक्षा देण्याची कटिबद्धता हंगामी सरकारने वारंवार व्यक्त केली आहे. दिनांक १२ फेब्रुवारीला होणाऱ्या निवड;णुकीत हादी उमेदवार देखील असणार होता. या हत्येसंदर्भात १७ जणांविरोधात ओपचारिकपणे आरोप ठेवण्यात आले आहेत. फैजल करिम मसूद हा मुख्य आरोपी असून राजकीय वैमनस्यातूनच आवामी लीगच्यावतीने हादीची हत्या करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र सरकारचा दावा हादीच्या पक्षाने फेटाळला असून सरकारी यंत्रणेतूनच ही हत्या झाल्याचा आरोप केला आहे.