तेल अवीव : गाझा पट्ट्यातील हमासचा कमांडर मोहम्मद सिनवार ठार झाला असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. दिनांक १३ मे रोजी इस्रायलच्या विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात सिनवार मारला गेला, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. सिनवार मारला गेला असल्याचा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी मे महिन्याच्या मध्यात केला होता. मात्र आज सिनवारच्या ठार होण्याचे अधिकृत समर्थन करण्यात आले आहे. कात्झ यांनी सिनवार ठार झाला असल्याचा दावा केला होता, तेंव्हा इतर डझनभर सहकाऱ्यांबरोबर सिनवारचा मृतदेह मिळाला असल्याचा दावा काही परदेशी माध्यमांनी केला होता. मात्र या वृत्ताच्या सत्यतेबाबत इस्रायलच्या सैन्यदलाला खात्री नव्हती. सिनवारबरोबर ज्यांचे मृतदेह मिळाले होते, त्यामध्ये ब्रिगेड प्रमुख मोहम्मद शबनाह याचा देखील मृतदेह होता. शबनाह याला सिनवारचा संभाव्य उत्तराधिकारी मानला जात होता. मात्र हवाई हल्ला झाला, तेंव्हा दोघेही बरोबर होते. त्यामुळे दोघेही एकाचवेळी मारले गेले असावेत, असे आयडीएफमधील सूत्रांनी सांगितले. दिनांक १३ मे रोजी इस्रायलच्या विमानांनी गाझामधील रुग्णालयाखालील भुयारांवर जोरदार बॉम्बफेक केली होती. तेथेच सिनवार लपून बसला असावा, असा अंदाज आहे. मोहम्मद सिनवार हा हमासचा म्होरक्या याह्या सिनवारचा धाकटा भाऊ होता. याह्या सिनवार ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जात होता. रफाहमध्ये इस्रायली सैन्याकडून तो मारला गेला होता. तेंव्हापासून गाझामधील हमासची सूत्रे मोहम्मद सिनवारकडे आली होती. हमासच्या ताब्यात असलेल्या ५८ ओलिसांबाबतचे निर्णय तोच घेत होता. या ५८ जणांपैकी २१ जण अजूनही जिवंत असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे.