“वाघोली येथे चिखलमय रस्ता ग्रामस्थांनी केला दुरुस्त’; रामभाऊ दाभाडे यांचा पुढाकार

वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली भावडी फुलमळा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे चिखलमय झाला होता. या रस्त्याची दुरुस्ती पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, निखिल भाडळे यांनी स्व खर्चाने करून एक आदर्श उभा केला आहे.
पावसाच्या पाण्यामुळे वाघोली भावडी फुलमळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. मनपा प्रशासनाने रस्त्यावरील पावसाची पाणी काढण्यासाठी जुन्या महावितरणच्या ऑफिस जवळ मंड पंप बसवून रस्त्यावरचे पाणी काढले आहे.
ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्ता चिखलमय झाल्याने नागरिकांना ये जा करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. जवळपास नऊ ट्रक रस्ता दुरुस्ती साहित्य टाकून हे खड्डे बुजवण्यात आले असून या भागात राहणाऱ्या तीन हजार नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
या भागात असणाऱ्या शाळकरी मुलांना सोडवण्यासाठी येणाऱ्या पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. रामभाऊ दाभाडे आणि निखिल भाडळे यांनी स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना अनमोल असे सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांच्या आभार मानले आहे.





