MSRTC News: लग्नकार्य अन् सहलींचे बजेट कोलमडणार! एसटी महामंडळाचा सामान्य नागरिकांना मोठा झटका
MSRTC News: एसटी महामंडळाकडून प्रासंगिक कराराच्या बससेवेच्या दरात किलोमीटरमागे वाढ; नवीन दरपत्रक लागू.

MSRTC News – लग्नकार्य असो, देवदर्शनाची यात्रा असो किंवा कौटुंबिक सहल. मोठ्या संख्येने प्रवास करण्यासाठी एसटी बस आरक्षित करणाऱ्या नागरिकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रासंगिक कराराच्या बससेवेचे दर वाढविले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
एसटी महामंडळाकडून प्रासंगिक करारासाठी नवीन दरपत्रक लागू करण्यात आले आहे. त्यानुसार बसच्या प्रकारानुसार प्रतिकिलोमीटर दर निश्चित करण्यात आले आहेत. ४५ आसनी साध्या बससाठी आता प्रतिकिलोमीटर ७५ रुपये आकारले जाणार आहेत. ५६ आसनी राजमाता जिजाऊ बससाठी प्रतिकिलोमीटर ९० रुपये दर राहणार आहे. जुन्या दराच्या तुलनेत प्रतिकिलोमीटर २० रुपयांची वाढ झाली आहे.
डिझेलच्या वाढत्या किमती, बसच्या देखभालीचा खर्च आणि सुटे भाग तसेच टायरच्या किमतीत झालेली वाढ यामुळे दरवाढ करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाढत्या खर्चाचा परिणाम प्रासंगिक कराराच्या सेवांवरही झाला आहे. नवीन दरपत्रकात स्वच्छता शुल्काचीही तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांकडून प्रतिव्यक्ती दोन रुपये स्वच्छता शुल्क आकारले जाणार आहे.
याशिवाय किमान अंतराची आकारणी लागू राहणार आहे. बस आरक्षण रद्द केल्यास त्यासाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागणार आहे. अतिरिक्त वेळेसाठी दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. अनामत रकमेच्या नियमांतही बदल करण्यात आले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींसाठी मात्र ५० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी एसटी बस आरक्षित करताना काहीसा दिलासा मिळणार आहे.
४५ आसनी बससाठी सवलतीनंतर प्रतिकिलोमीटर ३७ रुपये ५० पैसे दर राहील. ५६ आसनी बससाठी प्रतिकिलोमीटर ४५ रुपये आकारले जातील. प्रतिकिलोमीटर २० रुपयांची वाढ झाल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे अनेक कुटुंबांना नियोजित खर्चाचा फेरविचार करावा लागू शकतो. काही नागरिक खासगी ट्रॅव्हल्स किंवा मिनीबसचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.





