ST bus accident : सांगलीतील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, 15 हून अधिक जखमी
ST bus accident : सांगलीतील विटाजवळ रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोघांचा मृत्यू असून १५ ते १६ प्रवासी जखमी झाले आहेत.

ST bus accident : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटाजवळ रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोन्ही बसमधील १५ ते १६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, रेवणसिद्ध घाटातील रस्त्यावर दोन एसटी बस समोरासमोर आल्या. त्यानंतर दोन्ही बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, १५ ते १६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घाटातील रस्त्याची स्थिती, बसचालकांचे नियंत्रण आणि इतर संभाव्य कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जखमींची संख्या आणि प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर अपघाताचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.





