MSLTA Icon Tennis Tournament : वरद पोळ,नमिश हुड यांचा मुख्य फेरीत प्रवेश…

पुणे – ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन (१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात वरद पोळ, शौनक सुवर्णा, नमिश हुड, अनिश वडनेरकर यांनी, तर मुलींच्या गटात सारा फेंगसे, काव्या पांडेदेवेशी पडिया आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत अव्वल मानांकित वरद पोळने तेराव्या मानांकित अमोघ पाटीलचा ६-३, ६-३ असा तर, नमिश हुडने दुसऱ्या मानांकित आरव ईश्वरचा ७-५, ६-४ असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. अनिश वडनेरकरने आश्रित मज्जीला ६-४, ६-१ असे पराभूत केले.
संघर्षपूर्ण लढतीत शौनक सुवर्णा याने अकराव्या मानांकित स्मित उंद्रेचा ६-४, ४-६, १०-८ असा तीन सेटमध्ये पराभव केला. मुलींच्या गटात सारा फेंगसे हिने सान्वी राजूचा ६-१, ६-१ असा तर, शर्मिष्ठा कोद्रेने कायरा मांडकरचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. चुरशीच्या लढतीत देवेशी पडिया हिने वीरा काकडेचा टायब्रेकमध्ये ६-७), ६-४, ११-९ असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.



