MS Dhoni : धोनीची धमाकेदार कमबॅक तयारी! निवृत्तीच्या अफवा संपल्या, IPL 2026 साठी रांचीमध्ये गाळतोय घाम

MS Dhoni IPL 2026 Preparations : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामासाठी (IPL 2026) सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. १५ नोव्हेंबर रोजी रिटेन्शन लिस्ट जाहीर होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, यात सर्वाधिक चर्चा आहे, ती महेंद्र सिंग धोनीची. कारण त्याने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत आयपीएलच्या आगामी हंगामासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या धोनीच्या संभाव्य निवृत्तीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. तो आयपीएलमधून संन्यास घेऊन चेन्नई सुपर किंग्स (CSK) साठी ‘मेंटॉर’च्या भूमिकेत येऊ शकतो, असे दावे केले जात होते. मात्र, धोनीचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा ‘रूटीन’ पाहता, या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट होत आहे.
रांचीमध्ये सुरू आहे कठोर प्रशिक्षण –
माही रांचीतील आपल्या आलिशान घरापासून सुमारे १० किलोमीटर दूर असलेल्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पुढील हंगामासाठी स्वतःला तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. त्याने स्वतःसाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण वेळापत्रक तयार केले आहे, जेणेकरून तो पुन्हा एकदा ‘बेस्ट फिनिशर’ म्हणून स्वतःला सिद्ध करू शकेल.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार –
धोनी गेल्या दोन महिन्यांपासून स्टेडियममध्ये दररोज दुपारी १.३० वाजता पोहोचतो. यानंतर तो सुमारे एक तास जिम करतो. त्यानंतर तो पॅड घालून नेटमध्ये जवळपास दोन तास केवळ ‘पॉवर-हिटिंग’ शॉट्सची ट्रेनिंग करतो. सेंटर विकेट खाली असल्यास, तो सामन्यासारखी परिस्थिती मनात तयार करून त्यानुसार सराव करतो.
फलंदाजीचा सराव झाल्यावर माही थेट स्वीमिंग पूलमध्ये जातो, जिथे तो अर्धा तास स्वीमिंग करतो. याद्वारे तो स्वतःला आराम देण्यासोबतच स्टॅमिना वाढवण्याचा सराव करतो. धोनी दररोज सुमारे ४.३० तास स्टेडियममध्ये घालवल्यानंतर सायंकाळी ६ वाजता घरी परततो.
निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम –
माही ज्या पद्धतीने मेहनत घेत आहे, त्यावरून आयपीएल २०२६ खेळण्याची त्याची इच्छा स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या आठवड्यात सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. विश्वनाथन म्हणाले होते, “नाही, तो (धोनी) या आयपीएलपूर्वी निवृत्त होणार नाहीये. तो पुढचा हंगाम खेळेल, अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे.” आता धोनीच्या या मेहनतीमुळे चेन्नईचे चाहते नक्कीच सुखावले असतील.





