MS Dhoni Admits : ‘ती मोठी चूक होती…’, सहा वर्षांनंतर धोनीने मान्य केली चूक, लाईव्ह सामन्यात घातला होता राडा; म्हणाला, ‘जेव्हा राग…’

MS Dhoni admits storming onto field in no-ball fiasco ahead IPL 2025 : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. त्याला हे नाव देण्यात आले कारण तो प्रत्येक परिस्थिती अतिशय शांतपणे सोडवण्यासाठी ओळखला जातो. विजय असो वा पराभव, तो नेहमीच स्वतःला शांत ठेवण्यात यशस्वी झाला, पण एकदा त्याचा भयानक राग आयपीएलमध्ये दिसून आला. जेव्हा तो पंचांचा सामना करण्यासाठी मैदानावर गेला होता. आता धोनीने त्या कृतीवर आपले मौन सोडले आहे.
खरंतर, आयपीएल २०२५ चा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे, पण त्याआधी, धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पंचांशी वाद घालताना दिसला होता. आता ६ वर्षांनंतर धोनीने आपली चूक मान्य केली आहे.
एमएस धोनीने मान्य केली ती चूक –
एमएस धोनी एका कार्यक्रमात सांगितले की, “मी रागात मैदानात गेल्याने, ते सर्व घडले होते. ती खूप मोठी चूक होती. असे अनेक वेळा घडतात, जेव्हा काही गोष्टी तुम्हाला रागवयाला भाग पाडतात. आपण अशा खेळात आहोत, जिथे प्रत्येक सामना जिंकण्याची अपेक्षा असते. तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. म्हणूनच मी म्हणतो की जेव्हा तुम्ही थोडे रागावलेले किंवा निराश असता तेव्हा तुमचे तोंड बंद ठेवा. दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. कारण ते दबाव हाताळण्यासारखे आहे. जर तुम्ही स्वतःला निकालापासून वेगळे करू शकलात तर ते मदत करते.”
हेही वाचा – IPL 2025 Captains Salary : कोण आहे IPL 2025 चा सर्वात स्वस्त कर्णधार? आतापर्यंत दोन संघाची सांभाळलीय धुरा
धोनीने पंचांशी का घातला होता वाद?
ज्या सामन्यात धोनी पंचांशी वाद घालण्यासाठी मैदानावर गेला होता त्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात सीएसकेला १८ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीही बाद झाला. या षटकात गोलंदाजी करणाऱ्या बेन स्टोक्सने चौथ्या चेंडूवर फुल टॉस टाकला आणि हेच वादाचे कारण बनले.
धोनीला ठोठावला होता दंड –
मैदानी पंच उल्लास गांधी यांनी हा चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला. पण स्क्वेअर लेगवरील पंच ब्रूस ऑक्सेनफोर्ड यांनी निर्णय रद्द केला. यामुळे सीएसकेच्या तंबूत खळबळ उडाली आणि धोनीने आपला संयम गमावला. यानंतर धोनीने मैदानात येऊन पंचांशी निर्णयाबद्दल वाद घालण्यास सुरुवात केली. नंतर त्याला त्याच्या सामना शुल्काच्या ५० टक्के दंडही ठोठावण्यात आला.





