अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. जुन्या व्हिडिओमध्ये मृणालने बिपाशाची बॉडी-शेमिंग करत स्वतःला तिच्यापेक्षा “कितीतरी चांगली” असल्याचं म्हटलं होतं. यामुळे बिपाशाच्या चाहत्यांनी तिला जोरदार सुनावलं. अखेर मृणालने इन्स्टाग्रामवरून माफी मागत स्वतःची बाजू स्पष्ट केली. मृणालने लिहिलं, “१९ वर्षांची असताना मी अनेक मूर्खपणाच्या गोष्टी बोलले. त्या वेळी माझ्या आवाजाचं वजन किंवा मजेत बोललेले शब्द किती दुखावू शकतात, याची मला जाणीव नव्हती. माझा हेतू कधीच बॉडी-शेमिंग करण्याचा नव्हता. पण माझ्या शब्दांनी जर कुणाला दुखावलं असेल, तर मी दिलगीर आहे.” मृणालने सांगितलं की, हे वक्तव्य एका मुलाखतीत विनोदाच्या स्वरूपात झालं होतं, पण ते खूप पुढे गेलं. “आता मला उमजलंय की सौंदर्याचं प्रत्येक रूप महत्त्वाचं असतं आणि मी त्याला खरी किंमत देते,” असं ती म्हणाली. हा वाद जुना ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील काळातील आहे. को-स्टार अर्जित तनेजासोबतच्या मुलाखतीत मृणालने त्याला “तुला एखाद्या वेल-बिल्ट महिलेशी लग्न करावं” असा सल्ला देत “जाऊन बिपाशा बसूशीच लग्न कर” असं म्हटलं होतं. त्यानंतर स्वतःला बिपाशापेक्षा चांगली असल्याचं सांगत तिने बिपाशाला “मर्दाना बाई” असं संबोधलं होतं. या विधानामुळे निर्माण झालेल्या संतापानंतर मृणालने सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करत ही बाब संपवण्याचा प्रयत्न केला आहे.