पोलीस आयुक्त महोदय, या गावगुंडांना आतातरी आवरा…

पुणे – शांत, सुसंस्कृत आणि पेन्शनरांचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांची वाढती संख्या पाहता, ही धोक्याची घंटा ठरत आहे. हाणामारी, लुटमार, दागिने हिसकावणे या घटनांसह थेट कोयते फिरवणे, खून आणि हल्ली सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे पुण्यात पोलीस आहेत का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अशा घटनांमध्ये प्रामुख्याने अल्पवयील मुले, स्थानिक परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या युवकांचा समावेश आहे. किरकोळ कारणावरून कोयते उगारण्याच्या घटनांनंतर पोलिसांनी शहरातील कोयत्यांचे उत्पादक, पुरवठादार यांच्याकडून मोठा साठा जप्त करत गुंडांना आवर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पुढील काही दिवस या घटना थांबल्या. पण, या गुंडांनी डोके वर काढले आणि ठराविक काही दिवसांनी अशा घटना घडतच आहेत. त्यात जोडीस जोड म्हणजे, आता वाहनांची तोडफोड करण्याची जणु “फॅशन’ झाली आहे का, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत जुन्या वादांतून एका टोळक्याने स्थानिक नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली होती. पाठोपाठ वारजे भागात वाहन तोडफोडीची घटना घडली होती. या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकारनगर, तसेच वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. यानंतर रविवारी रात्री पुन्हा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड झाली. या घटनेच्या काही तास आधीच वाहन तोडफोड प्रकरणात पोलिसांनी टोळीवर मोक्का कारवाई केली होती. आता काही तास होत नाहीत, तोच कात्रज-भिलारेवाडी हद्दीत तशीच घटना घडली.
हे सर्व पाहता, गुन्हेगार वाढले आहेत? की पोलिसांचा धाक कमी झाला आहे? असे साधे प्रश्न पुणेकरांना पडला आहे. नाही म्हणायला काही भागांमध्येच पोलिसांची गस्त असते. “मार्च एन्ड’ काळात कोणत्याही कारणांवरून दंड उकळताना पोलिसांची संख्या पाहून वाटते, की पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह भूमिकेत आहे. पण, लगेचच कोयता, तोडफोडीच्या घटनांवेळी पोलिसांच्या धाकाबद्दल सामान्य पुणेकरांच्या मनात संशय निर्माण होत आहे.
बदल्या करून परिणाम होतो?
सहकारनगर, वारजे भागांतील वाहन तोडफोडीच्या घटनांनंतर पोलीस आयुक्तांनी अधिकाराचा वापर करत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बजावले. पण, त्यामुळे गुंडांकडून घडवल्या जाणाऱ्या घटनना थांबतील का? त्यासोबतच नवीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यानंतर कारवाई करताना बऱ्याच मर्यादा येतात. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी ठोस उपायांची गरज आणि पोलिसांचा धाक निर्माण होण्याची अपेक्षा सामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत.
सामान्य नागरिकांना भरपाई कोण देणार?
वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. अशा वेळी विमा असेल, तरीही संबंधित कंपनीकडून भरपाई दिली जात नाही. त्यामुळे नाहक नुकसान सोसावे लागत आहे. त्यांना नुकसानीची भरपाई कोण देणार? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनीच देणे अपेक्षित आहे. अशा घटना का घडतात? यामागे सामाजिक आणि गुन्हेगारांचे मानसशास्त्र याचाही अभ्यास करण्याची वेळ पोलिसांवरच आली आहे.





