MPSC Update: कृषी सेवेचा निकाल जाहीर! ८२८ जागांसाठी स्पर्धा आता मुलाखतीच्या टप्प्यावर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली. आयोगाने गुरुवारी या परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यभरातील ८२७ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. या निकालात पात्र ठरलेल्या एकूण उमेदवारांपैकी ५२० उमेदवार पुणे केंद्रावरील आहेत. प्रशासकीय कारणास्तव तीन उमेदवारांचा निकाल सध्या राखून ठेवण्यात आला आहे.
एमपीएससीकडून ८२८ जागांसाठी १ डिसेंबरला पूर्व परीक्षा आणि १८ मे रोजी मुख्य परीक्षा पार पडली होती. राज्यसेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवांचे निकाल वेळेत लागून त्यांच्या निवड याद्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, कृषी सेवेचा निकाल सहा महिने रखडल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.
निकालासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष निवेदनाद्वारे आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर, निकालामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.कागदपत्र पडताळणी आणि मुलाखती मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता ही त्यांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अधीन असणार आहे. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल.
माहिती चुकीची आढळल्यास उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे. तसेच, ज्या उमेदवारांना आपल्या गुणांची फेरपडताळणी करायची आहे, त्यांनी गुणपत्रक उपलब्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




