MPSC Result 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा अंतिम निकाल 8 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या या निकालानुसार विविध 20 संवर्गांतील एकूण 461 पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. (MPSC Result 2026) या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच जिल्ह्यातील आरती परमेश्वर जाधव या महिलांमध्ये राज्यात अव्वल ठरल्या आहेत. अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्याने उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या होत्या. मात्र आता निकाल जाहीर झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुण आणि सीमांकन उपलब्ध या निकालासोबतच शिफारसपात्र उमेदवारांचे गुण तसेच प्रत्येक प्रवर्गासाठी शेवटच्या उमेदवाराचे सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांच्या शिफारशी या त्यांच्या अर्जातील माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच अंतिम मानल्या जाणार आहेत. Vijay Lamkane MPSC Topper जर अर्जातील माहिती चुकीची किंवा अपूर्ण आढळली, किंवा आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आले, तर संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. (MPSC Result 2026) न्यायालयीन प्रक्रियेचा अडथळा काही उमेदवारांचा निकाल वैद्यकीय तपासणी अपूर्ण असल्यामुळे जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने हा निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहे. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये उपलब्ध झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. दिव्यांग, अनाथ, खेळाडू आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांची पात्रता संबंधित प्राधिकरणाकडून तपासल्यानंतरच अंतिम केली जाणार आहे. या निकालामुळे राज्यसेवा परीक्षेची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला असून यशस्वी उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (MPSC Result 2026)