MPSC Protest: “रोहित पवार एकटे पडले का?” एमपीएससी आंदोलनाला फक्त काँग्रेसची साथ; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गायब
MPSC Protest: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रोहित पवारांना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा; शरद पवार गटातील इतर ज्येष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह.

MPSC Protest- एमपीएससी कारभारातील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागण्यांसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या मागण्यांना राजकीय पाठिंबा मिळत आहे. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे हे नेते गेले तरी कुठे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले हे अराजकीय आंदोलन आहे. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने हे आंदोलन सुरू असले, तरी त्याला राजकीय रंग न देण्याचे आवाहन केले जात आहे. सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यानुसार या आंदोलनाच्या सुरुवातीपासून काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसाठी पाणी, भोजन आदींची व्यवस्था करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत भेट देणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे देखील येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक घटकांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने भूमिका मांडली जात असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आंदोलनस्थळी यावे, अशी मागणी काही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आंदोलनाचा मुद्दा राज्याच्या राजकीय पटलावर अधिक चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. पक्षाचा प्रमुख आमदार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत असताना, हे नेते या आंदोलनाकडे का फिरकत नाहीत, याबाबत विविध चर्चा रंगत आहेत.
केवळ सुप्रिया सुळे यांची भेट
खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, त्या वगळता पक्षातील इतर प्रमुख ज्येष्ठ नेते आंदोलनस्थळी आलेले नाहीत. पक्षाच्या नेतृत्वाकडून आंदोलनाला अधिक सक्रिय राजकीय पाठिंबा अपेक्षित होता, अशी भावना काही विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहेत.






