…अन्यथा एकाही परीक्षा केंद्रावर परीक्षा होऊ देणार नाही

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) येत्या 11 ऑक्टोबर व 22 नोव्हेंबर रोजी विविध पदांसाठी होणार परीक्षा रद्द करावी. मराठा आरक्षणाविना ही परीक्षा घेण्याचे प्रयत्न करू नये. अन्यथा महाराष्ट्रातील एकाही परीक्षा केंद्रावर परीक्षा होऊ दिली जाणार नसल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
“एमपीएससी’च्या दोन्ही परीक्षांच्या जाहिराती व अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती पूर्वीची आहे. संबंधित अर्जात “एसइबीसी’ अंतर्गत मराठा समाजाला जागा आरक्षित ठेवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरही मराठा आरक्षणाविना “एमपीएससी’ परीक्षा घेत आहे हे चुकीचे आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहुल पोकळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
“एमपीएससी’च्या परीक्षामधील “एसइबीसी’चे आरक्षण वटहुकूम काढून अबाधित ठेवूनच परीक्षा घेण्यात यावीत. जोपर्यंत वटहुकूम जारी होत नाही, तोपर्यंत परीक्षा घेऊ नयेत. आरक्षणाविना परीक्षा लादण्याचा प्रयत्न झाल्यास, त्यानंतर होणाऱ्या उद्रेकाला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार असेल, असेही राहुल पोकळे यांनी सांगितले.





