MPSC Exam: एमपीएससीची मोठी घोषणा! राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ‘वैकल्पिक विषय’ बाद; मुलाखतीचे गुण २७५ वरून
MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; २०२७ पासून होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून दोन्ही वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळले.

MPSC Exam – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सन २०२७ पासून होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून दोन्ही वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्यात आले आहेत. उमेदवारांच्या मुलाखतीचे गुण सुधारून १७५ करण्यात आले आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची रचना आणि रणनीती बदलणार आहे. नव्या सुधारित परीक्षा योजनेनुसार २०२७ पासून मुख्य परीक्षेत एकूण सात अनिवार्य पेपर असतील.
यात मराठी व इंग्रजी या भाषा विषयांचे प्रत्येकी २५ टक्के गुणांचे दोन अर्हताकारी पेपर, एक निबंधाचा पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर समाविष्ट असतील. भाषा विषयांचे पेपर केवळ पात्रतेसाठी असल्याने, अंतिम निकालासाठी निबंध व सामान्य अध्ययनाचे ४ पेपर मिळून १२५० गुणांचा विचार केला जाईल. लेखी परीक्षेचे एकूण गुण १२५० झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेखी परीक्षा व मुलाखतीचे गुणोत्तर संतुलित ठेवण्यासाठी मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्यात आले आहेत.
या संदर्भातील सविस्तर सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्रात राज्यसेवा परीक्षेमध्ये मुलाखतीला २७५ गुण असणे हे लेखी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय करणारे आहे. देशातील गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ यांसारख्या इतर राज्यांत मुलाखतीचे गुण २५ ते १५० दरम्यान असताना केवळ महाराष्ट्रातच हे प्रमाण तब्बल २७५ इतके जास्त का? १२५० गुणांच्या लेखी परीक्षेच्या तुलनेत मुलाखतीचे गुण अतिशय जास्त असल्याने मुख्य परीक्षेऐवजी मुलाखतच निर्णायक ठरत आहे. मुख्य परीक्षेतील मेरिटला खरा न्याय मिळण्यासाठी मुलाखतीचे गुण कमी करून ते १०० पर्यंत आणायला हवेत.





