MPSC Bharti : यूपीएससीप्रमाणे एमपीएससीकडून पुढील काळात कॅलेंडर तयार करण्यावर भर दिला जाईल. तसेच सध्या एमपीएससीत रिक्त असलेल्या तीन जागा भरण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी सामान्य प्रशासन खात्यामधील सेवा विभागाच्या सचिवांना इतर राज्यांच्या लोकसेवा आयोगाचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासानुसार एमपीएससीला नवे स्वरुप दिले जाईल. वर्ग 1 आणि वर्ग 2 बरोबर आता वर्ग 3 सुद्धा आपण एमपीएससीला दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे आणि आमदार विक्रम काळे यांनी एमपीएससी परीक्षा व पदे रिक्त असे मुद्दे आज विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, यूपीएससीमध्ये कधी परीक्षा होणार, कधी मुख्य परीक्षा आणि मुलाखत होणार, याचे कॅलेंडर निश्चित असते. पण दुर्दैवाने आपल्याकडे कॅलेंडर तयार केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण 2018-19 पासून राज्यात आरक्षणाचे वेगवेगळे निर्णय झालेले आहेत. त्यामुळे ईडब्लूएस, एसईबीसीचा विषय सातत्याने पुढे येतो. तसेच वेगवेगळ्या न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे कधी कधी भरतीमध्ये अधिक वेळ लागतो. पण पुढच्या काळात यूपीएससीप्रमाणे एमपीएससीने कॅलेंडर तयार करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. एमपीएससीच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2023 साली वर्णनात्मक परीक्षा पद्धत आणली होती. पण त्यावेळी विद्यार्थ्यांनी विनंती केल्यामुळे 2025 पर्यंत जुनीच पद्धत लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता 2025 पासून वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा होतील. या निर्णयाला बहुसंख्य विद्यार्थ्यांचा वर्णनात्मक पद्धतीला पाठिंबा आहे. परंतु काही मोजके विद्यार्थी विरोध करत आहेत. पण यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या विद्यार्थ्यांना यूपीएससीमध्ये नुकसान होत आहे. एमपीएससी वर्णनात्मक पद्धतीत असेल तर राज्यातील विद्यार्थ्यांना यूपीएससीतही फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे ही सर्व कामे एमपीएससीकडूनच होतात. केवळ काही इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरून घेतले जाते. गेल्या काही वर्षात एमपीएससीने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवला असून त्यात कोणताही गोंधळ झालेला नाही. सध्या एमपीएससीत रिक्त असलेल्या तीन जागा भरण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच एमपीएससीद्वारे पुढील काळात मोठ्या प्रमाणात भरती राबवली जाणार आहे. सर्व परीक्षा वेळेत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.