MPL 2025: ‘कोल्हापूर टस्कर’चा विजयासाठी संकल्प; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी साकडे

पुणे – महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल) तिसऱ्या हंगामात चषकावर नाव कोरण्याच्या दृढनिश्चयाने ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज झाला आहे. या संघाने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेऊन आणि आरती करून विजयासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर सुरू केलेल्या एमपीएलच्या तिसऱ्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या मालकीचा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ गेल्या दोन हंगामांपासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पहिल्या हंगामात हा संघ उपविजेता ठरला होता. यंदा नव्या जोमाने आणि संतुलित संघासह हा संघ मैदानात उतरला आहे.
उद्या (शनिवार दि. 7 जून) या संघाचा लीगमधील पहिला सामना होणार आहे. त्यापूर्वी संघातील खेळाडूंनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात दर्शन घेऊन विजयाचा संकल्प केला. यावेळी संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, श्रीकांत मुंढे यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते.
कर्णधार राहुल त्रिपाठी यांचा विश्वास –
“यंदा आमचा कोल्हापूर टस्कर संघ पूर्णपणे संतुलित आहे. आम्ही आत्मविश्वासाने आणि जोमाने खेळणार आहोत. संघातील सर्व खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, यावर्षी विजेतेपद निश्चितपणे पटकवू, असा आमचा निर्धार आहे. यासाठी आम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत,” असे कर्णधार राहुल त्रिपाठी यांनी सांगितले. या उपक्रमाने संघाच्या खेळाडूंमध्ये उत्साह संचारला असून, यंदाच्या हंगामात ‘कोल्हापूर टस्कर’ चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे.


