MPL 2025 : फलंदाजांची जोरदार टक्कर अन् राहुल त्रिपाठीची ‘ती’ चूक, VIDEO होतोय तुफान व्हायरल

MPL 2025 Run Out Video Viral : महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये धाव घेताना दोन फलंदाज एकमेकांना धडकले. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला, कारण फलंदाजांमधील टक्कर खूपच जोरदार होती. तरीही, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने खेळभावना दाखवली नाही आणि फलंदाजांना धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दोन्ही फलंदाज वेळेत आपापल्या टोकावर पोहोचले. दरम्यान, प्रसिद्ध खेळाडू राहुल त्रिपाठीच्या चुकीच्या थ्रोमुळे फलंदाजांना ओव्हरथ्रोचा चौकारही मिळाला.
शुक्रवारी पुण्यात झालेल्या एमपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात रायगड रॉयल्सने कोल्हापूर टस्कर्सचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयासह रॉयल्सने ईगल नाशिक टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले. आता ते शनिवारी पुण्यात क्वालिफायर २ मध्ये पुणेरी बाप्पाशी सामना खेळणार आहेत. यापूर्वी पुणेरी बाप्पा क्वालिफायर १ मध्ये नाशिक टायटन्सकडून आठ विकेट्सनी पराभूत झाला होता.
दोन खेळाडूंमध्ये जोरदार धडक –
View this post on Instagram
सामन्यादरम्यान रायगडच्या फलंदाजांनी दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसरी धाव घेताना दोघांचेही लक्ष चेंडूवर होते, त्यामुळे त्यांची एकमेकांशी धडक झाली. दोन्ही फलंदाज खाली पडले. याचा फायदा घेण्याच्या विचारात कोल्हापूरच्या संघाने दोघांना धावबाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे आणि राहुल त्रिपाठीच्या खराब थ्रोमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.
हेही वाचा – IND vs ENG : करुण नायरचा ऐतिहासिक पराक्रम, बनला क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू!
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूरने निर्धारित २० षटकांत ७ बाद १६४ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये अंकित बावनेने ५० चेंडूंत ५७ धावा केल्या, ज्यात दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. रायगडच्या निखिल कदमने तीन विकेट्स घेतला. यानंतर १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग रायगडने २ चेंडू आणि ६ गडी राखून पूर्ण केला. सलामीवीर विक्की ओस्तवालने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह ७४ धावा केल्या. कोल्हापूरकडून अनाद थेंगेला दोन विकेट्स घेता आल्या.





