खासदार उदयनराजेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा; शिवतीर्थावर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांनी मोठा केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात ‘एकच राजे उदयनराजे’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणाले की कार्यकर्त्यांची दिवाळी असते. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले बॅनर आणि होर्डिंग यामुळे संपूर्ण राजधानीत उदयनराजे प्रेमींचा माहोल असतो. सोमवारी दिवसभर साताऱ्यात विविध सामाजिक उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले. या वाढदिवसाची धमाकेदार सुरुवात सोमवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच झाली.
उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि स्नेही व रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी व शिवतीर्थ पोवई नाका येथे मोठ्या आकाराचा केक कापून महाराज साहेबांना शुभेच्छा दिल्या. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. या फटकांमुळे साताऱ्याचे आसमान वेगवेगळ्या रंगांनी उजळून निघाले. हा रंगीबेरंगी माहोल पाहण्यासाठी शेकडो कार्यकर्ते आणि सातारकर यावेळी उपस्थित होते. साधारण अर्धा ते पाऊण तास ही आतिषबाजी सुरू होती. ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी’ असे डायलॉग सांगणारे रेकॉर्ड नाक्यावर वाजवले जात होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात वेगवेगळ्या गाण्यांवर चांगलाच ताल धरला.
या उपक्रमाविषयी बोलताना सुशील मोझर म्हणाले की, ‘मंत्रालयापासून ते राजधानी साताऱ्यापर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फलक लागले आहेत .उदयनराजे हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात छत्रपतींचे तेरावे वंशज म्हणून आदरणीय आहेत. आम्हा कार्यकर्त्यांना त्यांचा मनापासून अभिमान आहे आम्ही सर्व त्यांचे मावळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आणि सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी होत असतो खासदार उदयनराजे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी ही फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत आहे.’





