लोणी काळभोर, (वार्ताहर) – दिड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना चांगले मताधिक्य मिळाले. शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचा फायदा अमोल कोल्हे यांना झाला. लोकसभेनंतर आता आगामी तीन महिन्यात होणार्या विधानसभा निवडणुकीत शिरूर-ज्ञहवेलीत काय घडणार आहे, याचं कुतहुल सर्वांनाच आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात 2009 पासून बाबूराव पाचर्णे विरुद्ध अशोक पवार अशी लढत झाली आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा लढतीत 2009ला अशोक पवार, 2014ला बाबुराव पाचर्णे तर 2019ला राष्ट्रवादीच्या अशोक पवारांनी पुन्हा एकदा मतदारसंघात विजय मिळवला. पाचर्णे यांचे निधन झाल्यानंतर अशोक पवार यांना मतदारसंघात म्हणावा असा तगडा प्रतिस्पर्धी दिसत नव्हता. पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा महायुतीसोबत गेल्यामुळे शिरूर मतदारसंघातील राजकारणाला आश्चर्यकारकरित्या वळण मिळाले; परंतु आमदार अशोक पवार हे मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहिले. लोकसभेला तुतारीचे काम करून मतदार संघातून कोल्हे यांना निर्णायक मताधिक्य देण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे अशोक पवार यांचं तिकीट सध्यातरी सेफ झोनमध्ये दिसत आहे. तेच महाविकास आघाडी कडून विधानसभेचे उमेदवार असतील हे फिक्स आहे. लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचपा अजितदादा विधानसभेला भरून काढणार का? की लोकसभेचे लीड कायम ठेवत अशोक पवार पुन्हा राष्ट्रवादीची तुतारी मतदारसंघात फुंकण्यात यशस्वी होणार? याची चर्चा गावागावात रंगू लागली आहे. त्यात लोकसभेच्या प्रचाराच्या धामधुमीतच अजितदादांनी अशोक पवारांना नडण्याची भाषा करून वादाला तोंड फोडलं होतं. त्यात लोकसभेचा निकालही विरोधात गेल्यामुळे आता अजित पवार येणार्या विधानसभेला याचा वचपा काढण्यासाठी मोठी फिल्डिंग लावू शकतात. महायुतीकडून कोण? शिरूर विधानसभा मतदारसंघ भाजप की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार? हे निश्चित झाल्यानंतरच महायुतीचा उमेदवार निश्चित होईल. महायुतीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद इच्छुक आहेत. भाजपकडून प्रदीप कंद यांनी जोरदार तयारी केली असून त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद व अध्यक्षपद भूषवले आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या निधी वाटपाच्या माध्यमातून त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क झाला आहे. जिल्हा परिषदेची दोन्ही पदे पाच वर्षे भूषवताना आपल्याला आगामी काळात आमदारकीची निवडणूक लढवायची आहे ही खुणगाठ त्यांनी तेव्हाच मनात बांधली आहे. त्यानुसारच निधीवाटप केलेले आहे. त्यावेळेस जोडलेली नाती त्यांना विधानसभेला उपयोगी पडू शकतात. वाघोलीतून दोन कटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर कटके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शांताराम कटके हि दोन नावेही इच्छुक म्हणून हळूहळू वर येत आहेत. ज्ञानेश्वर कटके यांनी गेल्या काही महिन्यांत दोन्ही तालुके पिंजून काढले आहेत. गेल्या काही वर्षापासून विविध कार्यक्रम, धार्मिक यात्रा यांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. अशोक पवार उजवे ठरणार? राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभेसारखाच निकाल विधानसभेला दिसेल असं निश्चित सांगता येत नाही. पण शरद पवारांची साथ, अमोल कोल्हेंची ताकद आणि स्वतःचा वैयक्तिक जनसंपर्क हे अशोक पवारांना निकालात कायम उजवं ठेवू शकतं. पण अजित पवारांनी ताकद लावली आणि बंडाळी न होता भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकच उमेदवार रिंगणात दिसला तर अशोक पवारांसाठी शिरूरमध्ये जोरदार लढत होऊ शकते.