Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंचं उद्यापासून आमरण उपोषण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या, नेमकं कारण काय?

पुणे : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील देवस्थानाकडे जाणारा बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झालेल्या रस्त्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ४ मार्च ला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, ३ मार्च रोजी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा शब्द दिला होता. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं उपोषण स्थगित केले होते.
मात्र, पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलेले आश्वासनाची तारीख संपून गेली, तरी देखील या रस्त्याचे कोणतेही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ९ एप्रिलला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषणाला बसणार आहे, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झाल्याने गेले अनेक दिवस नसरापूर सह पंचक्रोशीतील नागरिक आणि श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट याकरीता या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्कात होते. त्यामुळे महाशिवरात्रीपूर्वी सदर रस्ता व्हावा याकरीता सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय पत्रव्यवहार केला होता परंतू त्यास प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही.
महाशिवरात्रीला सुप्रिया सुळे श्री बनेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी बनेश्वरचा रस्ता न झाल्याने त्यांनी ४ मार्च रोजी जिल्हा प्रशासनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, दोन आठवड्यांत हा रस्ता तातडीने दुरुस्त केला जाईल पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी फोन वरून सुळे यांना कळवून पुढील सहा महिन्यांत बनेश्वर विकास आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन पीएमआरडीए कडून दिले होते. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले होते.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पण शासन आणि प्रशासनाकडून मला केवळ ‘तारीख पे तारीख ‘ मिळत आहे. शासन व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण अनास्थेला कंटाळून अखेर ४ मार्च रोजी मी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. परंतु तत्पूर्वी ३ मार्च रोजी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा शब्द मला दिला होता.
यानंतर मी उपोषण स्थगित केले. पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलेली डेडलाईन मागेच उलटून गेली. परंतु अद्यापही तेथे रस्त्याचे कोणतेही काम पुर्ण झालेले नाही. मुख्यमंत्री महोदयांना देखील ही बाब निदर्शनास आणून दिली होती. हा रस्ता भाविकांना ये जा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची दूरवस्था झाल्याने भाविकांना तसेच स्थानिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो. पण शासन व प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या अनास्थेला कंटाळून मी अखेर उद्या ९ तारखेला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला बसणार आहे, याची कृपया शासन व प्रशासनाने नोंद घ्यावी, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्यासाठी उद्या ९ एप्रिल रोजी उपोषण
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पण शासन आणि…
— Supriya Sule (@supriya_sule) April 8, 2025





