खासदार श्रीरंग बारणे यांनी उधळला हॅट्रिक झाल्याचा गुलाल

पिंपरी – दहाव्या फेरीत श्रीरंग बारणे यांना 45 हजाराचे मताधिक्य मिळाले. हे लीड सहजासहजी तोडणे संजोग वाघेरे-पाटील यांच्यासाठी आता सोपे राहिलेले नाही. त्यामुळे मतदान केंद्रात येऊन खासदार बारणे यांनी विजयाचा गुलाल उधळला. दरम्यान, घासून नाही तर ठासून आल्याच्या घोषणा ही कार्यकर्त्यांनी दिल्या.
मतमोजणीच्या दहाव्या फेरीत बारणे यांनी सुमारे अर्धशतकाचे लीड मारले होते. त्यांना 2 लाख 99 हजार 961 येवढी मते मिळाली. तर, वाघेरे-पाटील हे 44 हजार 728 मातांनी पिछाडीवर पडले. बारणे यांनी प्रत्येक फेरीत लीड घेऊन वाघेरे-पाटील यांना चांगलेच मागे टाकले.
दहाव्या फेरीत मात्र बारणे यानी 45 हजाराचे लीड घेऊन विजयाच्या दिशेने आगेकूच केली. हे लीड तोडणे वाघेरे यांच्यासाठी आता अशक्यच मानावे लागणार आहे. त्यामुळे बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी विजय आपलाच मानत गुलाल उधळला.
बारणे यांचा विजय समोर दिसताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बालेवाडी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. तर, बारणे समर्थक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोष करत विजयाची घोषणाबाजी केली. दरम्यान, अंतर्गत मतमोजणीचा अंदाज येताच बारणे खुद्द मतमोजणी केंद्रात दाखल झाले.
मी एक लाखांच्या मातांनी निवडून येणार हे सुरुवातीपासून सांगतआलोय. अधिकृत आकडेवारी समोर आली नसली तरी मी समोरच्याला त्याची जागा दाखवून दिली आहे.
– खासदार श्रीरंग बारणे





