Uttar Pradesh : खासदाराची तब्येत बिघडल्याने तातडीने रुग्णालयात दाखल; लखनऊमध्ये उपचार सुरू
Uttar Pradesh : गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता, त्यानंतर अचानक शुक्रवारी दुपारपासून त्यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील गाझीपूर लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार अफझाल अन्सारी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझीपूर येथून रुग्णवाहिकेने त्यांना लखनऊला आणण्यात असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफझाल अन्सारी यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. मात्र, शुक्रवारी दुपारपासून त्यांच्या छातीच्या खाली आणि पोटाच्या वरच्या भागात वेदना होऊ लागल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. यानंतर नातेवाईकांनी त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल केले. अफजाल अन्सारी यांचे पुतणे आणि आमदार अब्बास अन्सारी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
अब्बास अन्सारी यांनी पोस्टमध्ये अफजाल अन्सारी यांची तब्येत अचानक बिघडल्याचे सांगितले. तसेच ते लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार घेत असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी नागरिकांना अफजाल अंसारी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
अफझाल अन्सारी यांची राजकीय कारकिर्द
अफझाल अन्सारी हे गाझीपूर लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार असून पूर्वांचलमधील बलाढ्य नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. अफझाल हे पूर्वांचलचे बाहुबली नेते स्व. मुख्तार अन्सारी यांचे मोठे भाऊ आहेत. अफझाल अन्सारी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातून (भाकपा) आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि मोहम्मदाबाद मतदारसंघातून ते सलग पाच वेळा ‘भाकपा’चे आमदार राहिले आहेत, तसेच गाझीपूर मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत.
२००४ मध्ये अफझाल अन्सारी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर २००४ मध्ये ते सपाच्या तिकिटावर खासदार झाले. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. यानंतर २०१९ मध्ये ते बसपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकून आले, परंतु २०२३ मध्ये त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. वर्ष २०२४ मध्ये ते पुन्हा एकदा सपाच्या तिकिटावर गाझीपूरमधून खासदार म्हणून निवडून आले.
हेही वाचा:





