Varasgaon Dam : वरसगाव धरणातील पाणी पातळीत वाढ! ४१०४ क्युसेक विसर्ग सुरू, पाटबंधारे विभागाकडून नागरिकांना खबरदारीचे अवाहन

Varasgaon Dam : राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. अनेक नद्यांना पूर आला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. पुण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कधी विश्रांती अन् पुन्हा सुरूवात अशी पुण्यात पावसाची परिस्थिती आहे. जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे वरसगाव धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
आज 27 जुलै रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज सकाळी ९ वाजता वरसगाव धरणामधून नदी पात्रामध्ये २२७२ क्युसेक विसर्ग वाढवून सांडव्याद्वारे ३५०४ क्युसेक करण्यात आला आहे. तसेच विद्युत निर्मिती केंद्राद्वारे ६०० क्युसेक एकूण ४१०४ क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.
यामुळे नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, अशा सूचना संबंधित सखल भागातील नागरिकांना देण्यात आल्या आहेत, असे आवाहन मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे मोहन शांतराम भदाणे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.





