satara | मतदार जागृतीसाठी फलटणमध्ये मोटारसायकल रॅली उत्साहात

फलटण,(प्रतिनिधी) – गत लोकसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघात 67.5 टक्के मतदान झाले होते. यावेळी ते वाढवून 75 टक्क्यांहून अधिक होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी या निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले.
मतदार जागृतीसाठी फलटण शहरात झालेल्या मोटारसायकल रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, पदयात्रा, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, पत्रक वितरण याद्वारे मतदारांचे प्रबोधन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून आज मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयापासून सुरू झालेली मोटारसायकल रॅली महात्मा फुले चौक, गजानन चौक, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतिसिह नाना पाटील चौक, पृथ्वी चौक, डी. एड्.चौक, गिरवी नाका या मार्गे पुन्हा तहसील कार्यालय येथे पोहोचल्यावर रॅलीची सांगता झाली.
या रॅलीमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, ‘स्विप’चे नोडल अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी एस. के. कुंभार, पथकप्रमुख शहाजी शिंदे, सहाय्यक ‘स्विप’ अधिकारी सचिन जाधव शहरातील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी, मतदान पर्यवेक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, फलटण लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य व स्विप नियोजन कक्षाची टीम सहभागी झाली होती.





