‘आईने वेळोवेळी सांगितलं पण…’; ब्रेकअप नंतर अशी झाली ‘अनिता हसनंदानी’ची अवस्था

Anita Hassanandani : टीव्ही आणि चित्रपटांच्या जगात आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ‘अनिता हसनंदानी’ हिला आज कुणाच्याही ओळखीची गरज नाही. तिने केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे, तर हिंदीसह तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच अनिता तिच्या वैयक्तिक जीवनामुळेही कायमच चर्चेत राहिली आहे.
आज ती तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत असली, तरी एक काळ असा होता, जेव्हा ब्रेकअपमुळे ती खूपच खचून गेली होती. अनिताचं नाव एकेकाळी अभिनेता एजाज खानसोबत जोडले गेले होते. हे नातं दोघांनीही लपवले नव्हते. एजाजनेही अनेक वेळा मुलाखतींमध्ये अनितासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे.
एका मुलाखतीत अनिताने एजाजसोबतच्या नात्याबद्दल तिच्या मनातील भावना शेअर केल्या. ती म्हणाली, “हे माझ्या आयुष्यातील फार जुनं नातं होतं. मी या नात्यासाठी माझ्या आईच्या विरोधातही गेले. आमचा धर्म आणि संस्कृती वेगळे होते. आईने स्पष्ट विरोध केला नव्हता, पण तिच्या मनात एक सल कायम होता. आम्ही वैयक्तिक पातळीवर चांगले होतो, पण एकमेकांसाठी योग्य नव्हतो. त्यामुळे शेवटी हे नातं तुटलं.”
ब्रेकअपच्या आठवणी शेअर करत अनिता म्हणाली, “जेव्हा कोणी तुम्हाला बदलायचा प्रयत्न करतं, तेव्हा ते खरं प्रेम नसतं. मला त्यावेळी हे समजलं नव्हतं, कारण मी खऱ्या अर्थाने प्रेमात होते. मी त्याच्यासाठी स्वतःला बदलण्यास तयार होते. पण मी तसं केलं नसतं… मी स्वतः राहिले असते तर आज मी एक वेगळी व्यक्ती असते.” तिने हेही सांगितलं की त्या वेदनांमधून सावरायला तिला तब्बल एक वर्ष लागलं.
अनिताने २०१३ मध्ये रोहित रेड्डीसोबत लग्न केलं आणि आता ती एका गोंडस मुलाची आई आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिने अभिनयातून काही काळ विश्रांती घेतली. या काळात तिने आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले आणि अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असून आपल्या आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.





