जामखेड हादरलं.. ! रक्षाबंधनापूर्वी दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, घटनेने खळबळ

जामखेड : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी (8 ऑगस्ट) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 25 वर्षीय रूपाली नाना उगले हिने आपल्या दोन लहान मुलांसह घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेत रूपाली यांच्यासह तिचा 5 वर्षांचा मुलगा समर्थ आणि 3 वर्षांची मुलगी चिऊ यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, खर्डा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली आणि तिचे पती नाना उगले, मुलगा समर्थ आणि मुलगी चिऊ असे चार जणांचे कुटुंब नायगाव येथे राहत होते. शुक्रवारी सायंकाळी समर्थ शाळेतून घरी परतला. त्यानंतर रूपालीने गणवेशातील समर्थ आणि लहान चिऊ यांना घराजवळील विहिरीकडे नेले. तिथे तिने दोन्ही मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले.
संध्याकाळी नाना उगले आणि त्यांचे वडील शेतातून घरी परतले तेव्हा घरात कोणीही नसल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता विहिरीजवळ चप्पल दिसल्या. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा बोरीच्या काट्यांद्वारे विहिरीतून तिनही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल राजपुत यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी ग्रामस्थ आणि रूपालीच्या माहेरच्या नातेवाइकांची मोठी गर्दी जमली होती. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र स्थानिकांमध्ये याबाबत तीव्र चर्चा सुरू आहे. खर्डा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, रूपालीच्या मानसिक स्थिती आणि कौटुंबिक परिस्थितीचा तपास करत आहेत.
परिसरात शोककळा
रक्षाबंधनासारख्या सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने नायगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका तरुण आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, लवकरच यामागील कारण समोर येण्याची शक्यता आहे.





