जामखेड: कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ; सामाजिक कार्यकर्त्यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

जामखेड : सत्तेच्या मस्तीत निर्ढावलेले राज्यकर्ते आणि त्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या सरकारी यंत्रणांमुळे सामान्य जनतेचे जीवन अधिक कठीण झाले आहे. विशेषतः दीन-दुबळ्या आणि मागासवर्गीय समाजाला या व्यवस्थेचा मोठा फटका बसत आहे. असाच एक गंभीर प्रकार पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घडला, जिथे तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी कडक कारवाई करावी, दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.
सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, विकी सदाफुले, पै. सरनोबत, प्रा. विकी घायतडक, सनी सदाफुले, अशोक आव्हाड, सचिन सदाफुले, शिवाजी ससाणे, जोंगेद्र थोरात, मुंकुद घायतडक, आकाश साठे, विशाल समिंदर, सुरेखा सदाफुले, विक्रांत आब्दुले, अवधूत पवार, सूर्यकांत सदाफुले, आकाश घायतडक आणि अनिल जावळे यांनी एकत्र येत हे निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमधील या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटना समाजातील मागासवर्गीयांवरील अन्याय आणि भेदभावाचे द्योतक आहेत. सरकार आणि पोलीस यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहावे आणि पीडितांना त्वरित न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी नमूद केले. या मागणीला पाठिंबा दर्शवत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.





