दुबई : ओमानची राजधानी मस्कतमधील शिया मुस्लिमांच्या एका मशिदीवर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ६ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. भारतीय दूतावासाने ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहीती दिली. याशिवाय एक पोलीस आणि पाकिस्तानचे 4 नागरिक देखील या हल्ल्यात ठार झाले. तर तब्बल २८ जण जखमी झाले. अल-वदी-अल-कबीर भागातल्या इमाम अली मशिदीवर सोमवारी रात्रीच्यावेळी हा हल्ला झाला होता. हल्ल्याच्यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान तिन्ही हल्लेखोर दहशतवादी मारले गेले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इसिसकडून इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये शिया मुस्लिमांचे समारंभ, मिरवणुका आणि प्रार्थनास्थळांवर वारंवार हल्ले केले जात असतात. मात्र ओमानमध्ये अशाप्रकारे हल्ले केल्याचा दावा इसिसकडून यापूर्वी कधीही केला गेला नव्हता.