Moshi Garbage Depot: कचरा डेपोच्या विरोधात मोशीकर आक्रमक; बैठकीत तीव्र संताप
Moshi Garbage Depot: आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

मोशी – शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न बिकट होत असतानाच मोशीकर देखील आता कचरा डेपो हटविण्याची मागणी करत आक्रमक झाले आहेत. मोशी कचरा डेपो हटविण्याची मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे. यासाठी मोशी येथे स्थानिक नागरिकांनी एक बैठक आयोजित करत ‘कचरा डेपो हटाव, मोशी बचाव’ आंदोलनाची हाक दिली.
या बैठकीला माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक नितीन काळजे, नगरसेवक तुषार सहाणे, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, नगरसेवक सचिन तापकीर, नगरसेविका सुजाता बोराटे आणि सारिका गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, राष्ट्रवादी काॅंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्यासह मोशी, चऱ्होली आणि चिखली परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मोशी येथील कचरा डेपोमुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि पर्यावरणाची होणारी हानी याविरोधात ‘कचरा डेपो हटाव, मोशी बचाव’ आंदोलनासाठी मोशी ग्रामस्थांची बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येचा सामना करत असताना प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
गावाच्या आरोग्याचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने आता सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कचरा डेपोच्या प्रश्नावर केवळ चर्चा आणि निवेदनांपुरते मर्यादित न राहता व्यापक आंदोलन करण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. कचऱ्याच्या गाड्या रोखण्यासाठी महामार्गावर बसून आंदोलन करण्याचा पर्यायही उपस्थित करण्यात आला.
कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. मात्र, आंदोलन करताना नागरिकांची सुरक्षितता, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणेही महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
२०१६ मधील आंदोलनानंतरही प्रश्न कायम
मोशी कचरा डेपोचा प्रश्न नवीन नसून २०१६ मध्येही या समस्येविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी आंदोलन करूनही सरकार आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आंदोलने आणि निवेदनांनंतरही प्रश्न प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांना पुन्हा एकदा एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. केवळ आश्वासने देऊन हा प्रश्न सुटणार नसून प्रत्यक्ष कृतीतून तो सोडवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
क्षमतेपेक्षा चार ते पाच पट कचरा?
मोशी येथील कचरा डेपोच्या क्षमतेपेक्षा तब्बल चार ते पाच पट कचरा येथे आणला जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा आणला जात असल्याने परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. कचरा डेपोमुळे परिसरातील तलावांनाही फटका बसल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. येथील काही तलाव नष्ट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांचे अस्तित्व धोक्यात येत असेल, तर ही बाब गंभीर असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ दुर्गंधीपुरता मर्यादित नसून तो पर्यावरण, जलस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
नगरसेवकांनी महापालिकेत पाठपुरावा करावा
या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिकेत ठोस भूमिका घेऊन पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांनी अनेकदा पत्रव्यवहार केला, निवेदने दिली आणि आंदोलनेही केली; मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांपर्यंत हा प्रश्न प्रभावीपणे पोहोचवून त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
‘गावाच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे. पत्रव्यवहार करून आणि निवेदने देऊन उपयोग होत नसेल, तर आता आंदोलनाची दिशा अधिक ठाम करावी लागेल. स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेत या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करावा आणि आयुक्तांना निवेदन देऊन प्रश्न सोडवण्यासाठी दबाव आणावा. राजकारण येते आणि जाते; मात्र गावाचा प्रश्न सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. ग्रामस्थ आज एकत्र आले नाहीत, तर कचरा डेपोचा प्रश्न सुटणार नाही.’ – निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्ते
‘मोशीच्या कचऱ्याच्या डेपो मुद्द्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक पोटतिडकीने पालिकेत आवाज उठवतो, पण सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. मी स्वतः आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ते निर्णय होई पर्यंत सोबत राहणार.’ – नितीन काळजे, माजी महापौर, विद्यमान नगरसेवक
‘मोशी मध्ये काय कचऱ्याचे डोंगर बनवता का? पर्यावरणाचा विषय गंभीर झाला आहे. मोशीतील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आणखी किती वर्षे मोशीकरांनीच हा त्रास सहन करायचा ? पक्षाचा विषय बाजूला ठेऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.’ – धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक
‘सत्ताधारी असो किंवा विरोधक सर्वांनी मोशी वाचवण्यासाठी एकत्र येऊ आणि एक दिवस आंदोलन करून उपयोग नाही आपण एकदा आंदोलन चालू केलं तर आठ दिवस तिथून हलवायच नाही एकही कचऱ्याची गाडी खाली करून द्यायची नाही.’- निखिल बोऱ्हाडे, नगरसेवक
‘कचरा डेपोचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मोशीगावची सून म्हणून स्वतः सर्व मोशीतील महिलांना घेऊन आंदोलनात सामील होणार.’ – प्रा. कविता आल्हाट, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस.





