Rajgurunagar : चासकमानचे आवर्तन ४ ते ५ दिवसांत सुरू होणार
Rajgurunagar : पुणे जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या सन 2026-27 च्या पाणी नियोजनासंदर्भात गुरुवारी (दि. 29) विधान भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदा विभागाच्या सनियंत्रण समिती आणि कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चासकमान धरणातून येत्या चार ते पाच दिवसांत पाणी आवर्तन सोडण्यात येणार आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी उपलब्ध होणार असल्याने पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच भीमा नदीपात्रातील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असून, भामा आसखेड धरणातून भामा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणखी 11 दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या सन 2026-27 च्या पाणी नियोजनासंदर्भात गुरुवारी (दि. 29) विधान भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदा विभागाच्या सनियंत्रण समिती आणि कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खेड तालुक्यातील पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
भामा आसखेड प्रकल्पातून नदीपात्रातील बंधारे भरण्यासाठी सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणखी 11 दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे भामा नदीकाठच्या गावांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शेती, चारा पिके आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन शेतकर्यांना वेळेत पाणी मिळावे, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल आमदार काळे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित प्रशासनाचे आभार मानले.
डाव्या-उजव्या कालव्यांतून पाणी मिळणार
खेड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन चासकमान प्रकल्पातून आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत प्रत्यक्ष पाणी सोडण्यात येणार असून, डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कालव्यांतून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या आवर्तनामुळे भीमा नदीपात्रातील बंधारे भरण्यासही मदत होणार आहे.





