Moshi Garbage Depot: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ‘राजकीय लागेबांधे’? एसआयटीचा तपासात आता बडे नेते रडारवर
Moshi Garbage Depot: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून ११ सदस्यांच्या पथकाची स्थापना; प्रकल्पाची उभारणी, परवानग्या आणि सुरक्षेच्या त्रुटींची कसून चौकशी.

Moshi Garbage Depot – मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा तपास आता अधिक व्यापक झाला आहे. कचऱ्याचा डोंगर कोसळण्यामागचे नेमके कारण काय होते, सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कुठे त्रुटी राहिल्या आणि संबंधितांची जबाबदारी काय, याचा शोध विशेष तपास पथक (एसआयटी) घेत आहे. त्याचबरोबर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील कथित छुपी राजकीय भागीदारी आणि या प्रकल्पाशी संबंधित राजकीय लागेबांधेही तपासाच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती आहे.
त्यामुळे एसआयटीच्या अंतिम अहवालाकडे शहराचे लक्ष लागले आहे. मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी मोठी दुर्घटना घडली. कचऱ्याचा प्रचंड ढिगारा वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. अनेक कामगार जखमी झाले. दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला. एनडीआरएफ, भारतीय सैन्य, अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाच्या पथकांनी अनेक दिवस शोधमोहीम राबवली.
दुर्घटनेप्रकरणी अॅंटनी लॉरा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तपास केवळ संबंधित अधिकाऱ्यांपुरता मर्यादित ठेवण्यात आलेला नाही. दुर्घटनेची संपूर्ण साखळी तपासली जात आहे. प्रकल्पाच्या उभारणीपासून ते दुर्घटनेच्या दिवसापर्यंतच्या कामकाजाची माहिती गोळा केली जात आहे. वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत अधिकृत होती की अनधिकृत, याचीही पडताळणी सुरू आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याची कागदपत्रे तपासली जात आहेत. सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती, ठेकेदाराने नियमांचे पालन केले का, याचाही तपास केला जात आहे. यासोबतच प्रकल्पातील कथित राजकीय भागीदारीचा मुद्दाही तपासला जात आहे. प्रकल्पाशी कोणाचा आर्थिक किंवा व्यावसायिक संबंध आहे, याची माहिती घेतली जात आहे. कोणत्या राजकीय व्यक्तीचा या प्रकल्पाशी संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. मात्र, या संदर्भातील आरोप अद्याप तपासाच्या पातळीवर असून, त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
९० दिवसांत अंतिम अहवाल
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एसआयटीची स्थापना करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या या पथकात ११ सदस्य आहेत. पुढील ९० दिवसांत तपास पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एसआयटीचा अंतिम अहवाल तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेबाबत एसआयटीकडून सर्वकष तपास सुरु आहे. दुर्घटनेसंदर्भातील सर्व रिपोर्ट, कागदपत्रे यांची पडताळणी, नागरिकांनी, विविध संघटनांनी उपस्थित केलेल प्रश्न या सर्वांचा विचार करून तपास सुरु आहे. येत्या नोव्हेंबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात एसआयटीचा फायनल रिपोर्ट तयार होईल.
– मारुती जगताप, पोलीस उपायुक्त, परिमंडल तीन





