Moshi Garbage Depot Accident: ॲन्टोनी लारा कंपनी आणि पर्यावरण विभागाला नोटीस; आयुक्त विजय सूर्यवंशींचे आदेश
Moshi Garbage Depot Accident: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक; दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देत दोषींवर कडक कारवाईची तयारी.

Moshi Garbage Depot Accident – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. १२) मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या इमारतीत २२ तर इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. या पैकी इमारतीतून पाच नागरिक सुखरुप बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ),
पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. यामध्ये इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले. तर या घटनेत इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्काळ महापालिकेचा पर्यावरण विभाग व संबंधित ठेकेदार कंपनी यांना नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.





