प्रभात किरणे : नेत्रोन्मीलन
प्रभात किरणे : गणपतीच्या आदल्या रात्री मूर्तिकारांच्या कारखान्यात (कुंभारवाड्यात) एक विधी चालतो, ज्याबद्दल सामान्य माणसाला फारशी माहिती नसते. त्याला म्हणतात ‘नेत्रोन्मीलन’ म्हणजे मूर्तीचे डोळे उघडणं.

प्रभात किरणे
उद्या सकाळ झाली की घरोघरी टाळ-घंटा वाजतील. “बाप्पा मोरया”चा गजर होईल आणि पाटावर बसलेल्या बाप्पाच्या पायावर आपण डोकं टेकवू. पण कधी विचार केलाय का, की ज्या मूर्तीसमोर उद्या आपण हात जोडणार आहोत, तिच्यात प्राण नेमके कधी भरले जातात?
मूर्तीचे हात, पाय, पोट, पितांबर, दागिने, मोदक… सगळं आठवडाभर आधीच रंगवून तयार असतं. फक्त एकच गोष्ट बाकी ठेवलेली असते ते म्हणजे गणपतीच्या डोळ्यांच्या बाहुल्या. आदल्या रात्रीपर्यंत ती मूर्ती केवळ एक मातीचं सुबक खेळणं किंवा कलाकृती असते. पण आदल्या रात्री जेव्हा कारखान्यातले सगळे कामगार निघून जातात, बाहेर बाजाराचा आरडाओरडा सुरू असतो, तेव्हा मुख्य मूर्तिकार दिवा जवळ घेऊन एकाग्रतेने बसतो. हातात एकदम बारीक झिरो नंबरचा ब्रश, काळा आणि पांढरा रंग.
इथं खरी परीक्षा असते. हाताचा एक सूक्ष्म थरथरसुद्धा देवाची नजर बदलू शकते. डोळा किंचित तिरका झाला तर भाव बदलतो, रंग पसरला तर चेहऱ्यावरचा हसरेपणा निघून जातो. मूर्तिकार श्वास रोखून बाप्पाच्या डोळ्यात ती काळी बाहुली काढतो. आणि गंमत बघा, जसा तो ब्रश डोळ्यावरून फिरतो, तशी एका सेकंदात ती माती ‘जिवंत’ वाटते! ती मूर्ती आपल्याकडे बघून हळूच हसल्यासारखी वाटते.
कित्येक जुने मूर्तिकार सांगतात, “आम्ही वर्षभर माती तुडवतो, साचे भरतो, रंग मारतो… तोपर्यंत तो फक्त एक धंदा असतो. पण आदल्या रात्री जेव्हा त्या डोळ्यात बाहुली उमटते, तेव्हा आमचाही हात थरथरतो. कारण तोपर्यंत जी केवळ माती होती, ती अचानक ‘देव’ होऊन आपल्याकडे बघायला लागते.”
आपल्या संस्कृतीत हा विचार फार मोठा आहे. देव बाहेरून कुठून चालत येत नाही; तो माणसाच्या कल्पनेतून, श्रद्धेतून आणि आस्थेतून आकार घेतो. आदल्या रात्री त्या कुंभारवाड्यातल्या अंधुक बल्बखाली घडणारी ही घटना म्हणजे कलेचं रूपांतर श्रद्धेत होण्याचा क्षण असतो.Gप्रभात किरणे
आणखी एक युनिक गोष्ट म्हणजे ‘पत्री’. उद्या सकाळी पूजेसाठी आपण बाजारातून पानांची एक जुडी आणतो. आपण त्याला फक्त ‘२१ पत्री’ म्हणून देवावर वाहून टाकतो. पण आपल्या पूर्वजांनी गणपतीला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वा, माका, धोत्रा, शमी, जास्वंद, कण्हेर, आघाडा अशी रानटी पानं का ठेवली? मोगा, गुलाब, चाफा अशी सुगंधी फुलं बाप्पाला चालतात, पण अग्रमान मात्र रानातल्या बिनवासाच्या पानांनाच!
कारण गणपती हा मुळात ‘कृषी-संस्कृती’ आणि ‘निसर्गाचा’ देव आहे. ही २१ पानं म्हणजे पावसाळ्यात उगवणाऱ्या अत्यंत गुणकारी वनस्पती आहेत.
– पूनम नवघणे





