Moringa Chutney Recipe: मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या शेंगा पोषणमूल्यांचा खजिना आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण यासोबतच शेवग्याची पानं देखील आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर ठरतात. ही पानं रोजच्या आहारात संतुलित पद्धतीने समाविष्ट करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मोरिंगा चटणी. दक्षिण भारतात ही चटणी वाळवून केली जाते आणि तिला ‘मुरुंगई कीराई पोडी’ असंही म्हटलं जातं. ही चटणी चविष्ट तर आहेच, पण शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषक तत्वंही पुरवते. मोरिंगा पानांचे पोषणमूल्य यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरनुसार, १०० ग्रॅम कच्च्या मोरिंगा पानांमध्ये, ९.४ ग्रॅम प्रोटीन (मसल्ससाठी उपयुक्त) २ ग्रॅम फायबर (पचन सुधारते) ४ मि.ग्रॅ. आयर्न (रक्तवाढीस मदत) मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम मँगनीज, फोलेट, व्हिटॅमिन B6 आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C म्हणूनच ही चटणी रोजच्या आहारात समाविष्ट करणं फायदेशीर ठरू शकतं. मोरिंगा चटणीसाठी लागणारे साहित्य तेल – १ छोटा चमचा चणाडाळ – १ मोठा चमचा उडीद डाळ – १ मोठा चमचा धणे – १ मोठा चमचा जिरे – १ छोटा चमचा काळी मिरी – १ छोटा चमचा सुक्या लाल मिरच्या – ५ मोरिंगा (शेवग्याची) पानं – १½ कप चिंच – थोडी (चवीनुसार) हिंग – ½ छोटा चमचा मीठ – चवीनुसार Moringa leaves Chutney मोरिंगा चटणी बनवण्याची पद्धत 1. सर्वप्रथम शेवग्याची पानं देठापासून वेगळी करून स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे वाळवून घ्या. 2. कढईत तेल गरम करून त्यात चणाडाळ आणि उडीद डाळ टाका. सतत हलवत सोनसळी रंग येईपर्यंत परता. 3. त्यानंतर धणे, जिरे, काळी मिरी, सुक्या मिरच्या आणि बिया काढलेली चिंच घालून काही मिनिटं भाजा. 4. आता वाळवलेली मोरिंगा पानं यात घाला. गॅस मंद ठेवा आणि पानं कुरकुरीत होईपर्यंत परतत रहा. 5. सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झाल्यावर मिश्रण थंड होऊ द्या. 6. थंड झाल्यावर सगळं साहित्य मिक्सरमध्ये घ्या, त्यात हिंग आणि मीठ घाला आणि थोडंसं भरडसर वाटा. तयार आहे पौष्टिक मोरिंगा चटणी. साठवण आणि वापर ही चटणी एअरटाइट डब्यात भरून ठेवली तर जास्त काळ टिकते. फ्रिजमध्ये ठेवल्यास ती किमान एक महिना खराब होत नाही. ही चटणी तुम्ही, तूप घातलेल्या गरम भातासोबत, चपाती, पराठा, डोसा, खाखरा, पापड यांसोबत खाऊ शकता. चव आणि पोषण वाढवण्यासाठी यात भाजलेली शेंगदाणे किंवा तीळही घालू शकता.