पिंपरी | एकविरा देवीच्या दर्शनासाठी एक लाखाहून अधिक भाविक

कार्ला, (वार्ताहर) – नवरात्रीचा काळ आणि रविवार, हे सूत्र जुळून आल्याने रविवारी कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
संपूर्ण गडावर माणसांची दाटी झाल्याने गडावर भाविकांचा महापूर आल्याचे भासत होते. यंदाच्या नवरात्रोत्सवातील गर्दीचा उच्चांक रविवारी पाहायला मिळाला.
रविवारी घटाची चौथी माळ होती. विकेंड आणि नवरात्री यामुळे अगदी मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, सातारा भागातून भाविक एकविरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. गडाच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंतचा भाग माणसांच्या गर्दीने फुलून गेला होता.
देवीच्या दर्शनासाठी भाविकांना चार ते पाच तास दर्शनरांगेत थांबावे लागत होते. दुपारपासून ही गर्दी वाढत गेली. त्यामुळे पोलीस प्रशासनावर आणि मंदिर व्यवस्थापनावर काहीसा ताण आला होता.
एकाचवेळी एवढे भाविक आल्याने वाहनांची संख्या वाढून कार्ला फाटा ते वेहेरगाव भागात वाहनांची गर्दी झाली होती. कार्ला फाट्यावर वाहतूक कोंडी देखील झाली होती.
रविवारी गर्दींचा नवा उच्चांक गाठल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत जवळपास लाखभर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते.





