पुणे | शहरात ५५ लाखांपेक्षा जास्त वृक्षांची नोंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात तब्बल ५५ लाखांपेक्षा जास्त वृक्षांची नोंद करण्यात आली असून, शहरातील १५ वॉर्ड मध्ये ही वृक्षगणना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षगणनेसंदर्भात आदेश दिले असून, त्यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत ही वृक्षगणना करण्यात आली.
जिओग्राफीक इन्फर्मेशन सिस्टिम (जीआयएस) आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) चा वापर करून प्रत्येक वृक्षाची माहिती, भौगोलिक स्थान, अक्षांश आणि रेखांश, प्रजाती, स्थानिक आणि शास्त्रीय नाव, व्यास, उंची, सद्यस्थिबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार शहरात ५५ लाख ८१ हजार ५७८ एवढी वृक्षसंख्या नोंदविण्यात आली.
१५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही नोंद करण्यात आली असून, शहरात वृक्षांच्या एकूण ४३० प्रजाती आढळल्या आहेत. त्यात ७५ फमिलीज दिसतात. यात सर्वाधिक संख्या गिरीपुष्प या वृक्षांची आहे.
याशिवाय दुर्मिळ वृक्षांची संख्या १२४ नोंदवण्यात आली असून, त्यात जुन्या वृक्षांची (हेरिटेज ट्री) संख्या २८३८ आहे. हे हेरिटेज ट्री सार्वजनिक ठिकाणी आहेत. साहजिकच वड हा सर्वात मोठे खोड असलेला वृक्ष म्हणून नोंदवला गेला आहे.
शहरात सर्वाधिक हिरवळीचा भाग सहकारनगर, धनकवडी असून, सर्वाधिक कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहे. भवानीपेठ हा भाग जुन्या पुण्याचा भाग असल्यामुळे तेथे वाडे- वस्त्यांचा भाग आहे.
त्यामुळे तेथे वृक्षसंख्या कमी दिसते. याशिवाय हडपसर, कोथरूड, नगररस्ता, शिवाजीनगर, औंध बाणेर या भागातील वृक्षसंख्या चार लाखांच्या पुढे आहे. सन १९९५-९६ मध्ये पुण्यातील वृक्षसंख्या २८ लाख होती. २००७-८ मध्ये ती ३६ लाख झाली आणि आताच्या गणनेनुसार ती ५५ लाखांच्या पुढे गेली आहे.
अद्यापही गणना सुरूच
न्यायालयाने दर पाच वर्षांनी वृक्षगणना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही गणना करण्यासाठी सात ते आठ वर्षे लागतात. सध्या ५५ लाखांपेक्षा जास्त गणना झाली असली, तरी अद्याप काही ठिकाणची नोंद होणे बाकी आहे.
त्यामुळे या संख्येत किमान अडीच लाख वृक्षांची आणखी भर पडू शकते, अशी माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे किमान दहा वर्षांनी गणना व्हावी, असे मत यानिमित्ताने पुढे आले आहे.
गिरीपुष्प पाश्चात्य वनस्पती
गिरीपुष्प ही भारतीय प्रजाती नसून, ती पाश्चात्य प्रजाती आहे. या वृक्षांमुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे हे वृक्ष समूळ नष्ट झाले पाहिजेत, यासाठी पर्यावरणवादी अनेक संघटनांनी, व्यक्तींनी प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याऐवजी देशी झाडे लावावीत, अशी जागृती केली जात आहे. २५ वर्षांपूर्वी वृक्ष संख्या कमी असल्याने वेगाने वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. अनेक बांधकाम व्यावसायिकांनीही हेच वृक्ष लावले.
यामुळे आपल्याकडील पर्यावरणाला हानी होत असल्याचे लक्षात आल्याने त्याविरोधात जागृती झाली. त्यामुळे महापालिकेने देशी वृक्षांची यादी जाहीर करून वृक्ष वाटिकांमध्येही भारतीय प्रजातींची रोपे विक्रीसाठी ठेवली आहेत.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय वृक्षांची संख्या
१) धनकवडी – सहकारनगर – ११ लाख ९५ हजार ८९४
२) हडपसर मुंढवा – ४ लाख ९९ हजार ७५७
३) कोथरूड बावधन – ४ लाख ८८ हजार ९६५
४) नगर रोड -वडगाव शेरी – ४ लाख ८६ हजार ०२५
५) शिवाजीनगर घोलेरोड – ४ लाख ७६ हजार ५४६
६) औंध बाणेर – ४ लाख ५८ हजार ६९५
७) ढोले पाटील रोड – २ लाख ८५ हजार ४६९
८) येरवडा कळस धानोरी – २ लाख ५६ हजार ४३०
९) कोंढवा येवलेवाडी – २ लाख २७ हजार २४८
१०) वानवडी रामटेकडी – १ लाख ९७ हजार ४५९
११) वारजे कर्वेनगर – १ लाख ८९ हजार २४१
१२) सिंहगड रस्ता – १ लाख ६४ हजार ०४५
१३) बिबवेवाडी – १ लाख २९ लाख ८५६
१४) कसबा विश्रामबाग – ३५ हजार ४२६
१५) भवानी पेठ – १२ हजार ३४६





