अमरावतीच्या वैभवात पडली आणखी भर ! मेळघाटात आढळला ‘सामान्य बाज’ हा नवा पक्षी

अमरावती – अरण्य, वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींमुळे वैभवसंपन्न असलेल्या मेळघाटात ‘सामान्य बाज’ (कॉमन बझार्ड) या नव्या पक्ष्याची भर पडली आहे. पक्षी निरीक्षकांकडे असलेल्या नोंदीनुसार गेल्या दीडशे वर्षाच्या कालखंडात हा पक्षी पहिल्यांदाच या भागात आढळून आला.
देशभरात आढळणाऱ्या एकूण प्रजातींपैकी आजवर जवळपास २५ टक्के प्रजातींची या ठिकाणी नोंद झालेली आहे. मेळघाटच्या जंगलात पक्षी अभ्यासाची सुरुवात सुमारे दीडशे वर्षापूर्वी झाली होती. आतापर्यंतच्या अभ्यासातून आजवर ३०४ पक्ष्यांची नोंद झालेली आहे. मेळघाट येथे नुकतेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (बीएनएचएस) चार दिवसीय निसर्गशिबीर पार पडले. या दरम्यान अकोट वन्यजीव विभागातील जंगल भ्रमंतीमध्ये धारगड भागातील जंगलात सामान्य बाज हा दुर्मिळ पक्षी आढळून आला.
पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. निशिकांत काळे, बीएनएचएसचे अभ्यासक नंदकिशोर दुधे, पक्षिमित्रचे अमोल सावंत व शिबिरार्थींना हा पक्षी एका वाळलेल्या झाडाच्या खोडावर बसलेला आढळून आला. त्याचे निरीक्षण केले असता तो शुभ्रनयन तिसा या प्रजातीपेक्षा वेगळा वाटला. फार वेळ थांबून त्याचे सखोल निरीक्षण केले असता हा पक्षी सामान्य बाज असल्याची खात्री पटली.
हा पक्षी भारतात हिवाळ्यात स्थलांतर करून येतो. तो उत्तर पाकिस्तान व काश्मीर या प्रदेशातील रहिवाशी आहे. तो हिवाळ्यात इकडे येतो. या नोंदीमुळे सातपुडा हा स्थलांतरासाठी महत्वाचा संचार मार्ग असल्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचेही डॉ. जयंत वडतकर यांनी स्पष्ट केले.
कसा आहे सामान्य बाझ?
बाझ कुळातील सामान्य बाझ या पक्ष्याची इंग्रजी ओळख कॉमन बझार्ड किंवा स्टेपी बझार्ड अशी असून शास्त्रीय नाव बुटीओ बुटीओ वल्पीनस असे आहे. जवळपास ५५ सेंमी असलेला हा बाझ रंगाने गडद विटकरी असून छातीवर व डोक्यावर तपकिरी रंगाच्या उभ्या रेषा आहेत. चोच आखूड व टोकावर काळ्या रंगाची असून डोळ्यावर काळ्या रंगाची भुवई दिसते. शेपूट आखूड व त्यावर खालून बारीक उभ्या रेषा आहे. शिकारी पक्षी गटातील या पक्ष्याचे खाद्य इतर गरुड किंवा बाझ प्रमाणे लहान प्राणी, सरडे साप इत्यादी असून तो मासाहारी पक्षी आहे.





