Moradabad Lok Sabha Election: ‘मुरादाबाद’वरून समाजवादी पक्षात ‘गोंधळ’

Morabad Lok Sabha Seat Candidate: उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या जागेवरून समाजवादी पक्षात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. येथून आझम खान यांच्या गटाच्या रूची वीरा यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना आता उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रूची वीरा यांनी आज अर्ज दाखल करावा, अशा सूचना काल म्हणजे मंगळवारी सायंकाळी त्यांना करण्यात आल्या होत्या.
तथापि, समाजवादी पक्षाचेच एस टी हसन यांनी कालच मुरादाबाद येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रूची वीरा यांच्या नावाला समाजवादी पक्षाच्या मुरादाबाद येथील कार्यकर्त्यांचा पूर्ण विरोध आहे. कालच कार्यकर्त्यांनी त्यांच्या आणि आझम खान यांच्या पोस्टरची जाळपोळही केली.
दरम्यान, समाजवादी पक्षाकडून आज लखनौ येथून मुरादाबादकडे एक चार्टर्ड विमान पाठवण्यात आले. रामपूर येथील उमेदवाराचे नामांकन पत्र त्यात होते अशी माहिती समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रूची वीरा यांनाच मुरादाबाद येथून उमेदवार करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच आझम खान यांच्या नाराजीमुळेच एस. टी. हसन यांचे तिकिट कापण्यात आले. त्यामुळे हसन यांचे समर्थक रूची वीरा आणि आझम यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. आझम खान यांनी त्यांच्या रामपुरकडे लक्ष द्यावे. त्यांनी मुरादाबादमध्ये लूडबुड करू नये असे हसन यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अलिकडेच सीतापूर तुरूंगात आझम खान यांची भेट घेतली होती. आपले आझम खान यांच्याशी सगळे बोलणे झाले असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र त्यानंतरच आझम खान यांची नाराजीची चिठ्ठीही समोर आल्यामुळे समाजवादी पक्षातील कुरबुर समोर आली होती. अखिलेश आझम खान यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले असा दावा केला जात होता. तथापि, आता केवळ रामपुरच नाही तर तर मुरादाबादपर्यंत पक्षातील अंतर्गत बेदीली समोर आली आहे. रामपूर येथील आझम समर्थक पदाधिकाऱ्यांनी तर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
रामपुरमधून इमाम मुहिबुल्लाह नदवी
दरम्यान, आझम खान यांची नाराजी पत्करत अखिलेश यांनी रामपुरमधून इमाम मुहिबुल्लाह नदवी यांना रिंगणात उतरवले आहे. मुहिबुल्लाह हे दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम आहेत. ते मुळचे रामपुरचेच आहेत, मात्र पंधरा वर्षांपासून जामा मशिदीचे इमाम आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार स्वत: अखिलेश यांनीच रामपूरची जागा लढवावी अशी गळ आझम खान यांनी त्यांना घातली होती. ती त्यांनी नाकारली.





