देशात अन् राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून होणार सक्रिय; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

नवी दिल्ली : राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पण अद्याप काही सक्रीय झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे पूर्णपणे थांबली आहेत. त्यातच आता राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल. तर या आठवड्याच्या शेवटी मुंबईत मान्सून जोर धरेल आणि मुंबईकरांची उकाड्यातून सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 23 आणि 24 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
फक्त महाराष्ट्रात नाही तर राज्यातही परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्माघाताने अनेकांचे बळी गेले आहेत. या ठिकाणची जनता देखील पावसाची वाट पाहत आहेत. अशामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम आहे. अशामध्ये देशाची राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे दिल्लीकरांची उकाड्यातून सुटका झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, पश्चिम बंगाल, सिक्कीम तसेच मध्य प्रदेशात आज पावसाची शक्यता आहे. यासोबतच तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट, केरळ आणि पश्चिम हिमालयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचसोबत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. सध्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.





