पुणे – यंदा केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर अवघ्या २४ तासांत मान्सून कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखलही झाला. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रातील मुंबईसह पुण्यात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) यंदा १३ मे रोजीच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला आणि मान्सून अवघ्या दहा दिवसांत दि. २४ मे रोजी केरळ व कर्नाटकात दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनने आगेकूच सुरू करताना मान्सून एक्सप्रेस सुपरफास्ट झाली आणि अवघ्या २४ तासांत मान्सून गोव्यासह कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल झाला. संपूर्ण गोवा आणि देवगडपर्यंत भाग मान्सूनने व्यापला असून, मान्सून देवगड, बेळगावी, हावेरी, मंडया, धर्मपुरी, चेन्नई आणि कोहिमा मार्गे जात आहे. दरम्यान, ठळक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याचा भागात आहे. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण- गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ११ दिवस आधीच मुसंडी महाराष्ट्रात मान्सून जवळपास दि. ६ ते १२ जूनच्या आसपास दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून मे महिन्यातच तेही गतवर्षीपेक्षा अकरा दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला. याआधी २००६ मध्ये ३१ मे रोजी, तर सन १९९० मध्ये २० मे रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला होता. त्यामुळे तब्बल ३५ वर्षांनंतर महाराष्ट्रात २५ मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. घाट विभागात जोरदार राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांसह सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाट विभागात पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर उर्वरीत जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पाऊस पडणार असल्याने यलो अलर्ट दिला आहे. मागील दहा वर्षांत या तारखेला मान्सून महाराष्ट्रात आला २०२५ – २५ मे २०२४ – ६ जून २०२३ – ११ जून २०२२ – १० जून २०२१ – ५ जून २०२० – ११ जून २०१९ – २० जून २०१८ – ८ जून २०१७ – १० जून २०१६ – १९ जून २०१५ – ८ जून २०१४ – ११ जून २०१३- ४ जून २०१२ – ६ जून २०११ – ४ जून