Monsoon Delay: भात शेती संकटात? मावळात भात पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार?
Monsoon Delay: मावळ तालुक्यात जून महिना अर्धा संपला तरी मान्सूनचा पत्ता नाही; समाधानकारक पावसाअभावी पारंपरिक भात पेरण्या लांबणीवर.

Monsoon Delay – मान्सूनचा पाऊस अद्यापही तालुक्यात दाखल न झाल्याने खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून महिना अर्धा संपत आला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने भात पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली असून, पावसावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मावळ तालुका हा पारंपरिकरित्या पावसाळी पट्टा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होताच शेतकरी भात लागवडीच्या तयारीला वेग देतात.
मान्सूनपूर्व पावसामुळे शेतातील मशागतीची कामे पूर्ण करून वाफे तयार केले जातात आणि त्यानंतर रोपवाटिकांसाठी पेरणी सुरू होते. मात्र यंदा पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी न लावल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. तालुक्यात दरवर्षी सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून रोपवाटिकांसाठी पेरण्या सुरू होतात. यंदा मात्र १५ जून उलटूनही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही.
काही शेतकऱ्यांनी धाडस करून वाफ्यांवर पेरण्या केल्या असल्या तरी पाऊस न पडल्यास त्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी अपेक्षित पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पावसाशिवाय भात लागवडीचे नियोजन पुढे सरकणे कठीण असल्याने अनेक शेतकरी रोज आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसारही मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक परिस्थिती अद्याप पूर्णपणे अनुकूल झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.
कोकण किनारपट्टीवरही अपेक्षित वेगाने पाऊस सक्रिय नसल्यामुळे त्याचा परिणाम मावळसह पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी भागांवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मावळ तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी पूर्वनियोजन करण्यात आले आहे. विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून कृषी सहाय्यकांकडून सल्ला दिला जात आहे.
आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता
पावसाचा विलंब वाढल्यास केवळ पेरण्या उशिरा होणार नाहीत, तर पुढील रोपलागवड, वाढीचा कालावधी आणि उत्पादनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसावरच अवलंबून असलेल्या लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास रखडलेली मशागत आणि पेरणीची कामे वेगाने सुरू होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






