Mansoon Alert | पुण्यासह पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट ; ७२ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यांसह सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पुढील ७२ तासांत जोरदार, तर काही ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडेल. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना भारतीय हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट दिला आहे.पश्चिम मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर आंध्रप्रदेश व दक्षिण ओरिसा किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
विदर्भ व लगतच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण- गोव्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.राज्यात दि. १८ ते २० ऑगस्टदरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, तसेच नांदेड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल.
विदर्भातील चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.





