Mansoon Alert | कोकण, घाटात पावसाचा जोर वाढणार ; हवामान विभागाचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – वायव्य बंगालच्या उपसगारावरल कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून, ते उत्तर ओरिसा किनारपट्टीवर स्थिर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण-गोवा आणि विदर्भात बहुतांश तर मराठवाडा आणि मध्य महराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून अंदाज वर्तविला आहे.
राज्यात पुढील ४८ तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यातील घाट विभागात अति जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याच्या मैदानी भागात मेघगर्जना आणि सोसाट्याचा वाऱ्यासह अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पाऊस तर जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर घाट विभागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.





