Monalisa: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा करणार चित्रपटातून पदार्पण

Monalisa: प्रयागराज कुंभमेळ्यात चर्चेत आलेली मोनालिसा आता चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. तिचं खरं नाव मोना भोसले असून ती मूळची इंदूरची आहे. कुंभमेळ्यात माळा विकताना तिच्या सौंदर्यामुळे ती अचानक चर्चेत आली होती. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
कोणत्या चित्रपटात झळकणार?
मोनालिसा लवकरच ‘नागम्मा’ या मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. तिच्यासोबत अभिनेता कैलाश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पी. बिनू वर्गिस यांनी केलं असून, निर्मिती जिली जॉर्ज यांनी केली आहे. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून सप्टेंबर अखेरपर्यंत ते पूर्ण होणार आहे.
मोनालिसाची ओळख
जानेवारी महिन्यात मोनालिसाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ती प्रसिद्ध झाली.
मात्र या प्रसिद्धीमुळे तिच्या माळ विक्रीच्या व्यवसायावर परिणाम झाला. अनेक लोक फोटो–व्हिडिओ काढण्यासाठी तिच्यामागे लागतात, त्यामुळे तिच्या रोजीरोटीवर परिणाम होतो, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
मोनालिसा वयाने अवघी १६ वर्षांची आहे. तिला प्रसिद्धीपेक्षा उपजीविकेसाठीचा व्यवसाय जास्त महत्त्वाचा आहे, हे तिनं काही दिवसांपूर्वी माध्यमांनाही सांगितलं होतं.
आधी मिळालेली ऑफर
याआधी मोनालिसाला एक हिंदी चित्रपटाची ऑफर मिळाली होती, पण तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. मात्र आता ती मल्याळम चित्रपटातून अधिकृतपणे पदार्पण करत आहे.





