कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाला फिल्म ऑफर देणारा डायरेक्टर अटकेत, बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुंबई – कुंभ मेळ्यात (Kumbh Mela) आपल्या सौंदर्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मोनालिसाला (Monalisa) आपल्या चित्रपटात काम देण्याची ऑफर देणारा डायरेक्टर सनोज मिश्रा (Sanoj Mishra) पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. सनोज मिश्राला एका कथित बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टाने त्याची जमानत याचिका फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सनोज मिश्राला गाझियाबाद येथून 30 मार्च रोजी अटक करण्यात आली. सध्या तो नबी करीम पोलिस ठाण्याच्या (Nabi Karim Police Station) ताब्यात आहे. सनोज हा आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. ही अटक एका 28 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून झाली आहे. या महिलेने आरोप केला आहे की, सनोज मिश्राने गेल्या 4 वर्षांपासून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. छोट्या गावातून अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या या महिलेने सांगितले की, ती या काळात मुंबईत सनोज सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
महिलेचा असा दावा आहे की, सनोजने तिला तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सनोजने लग्नाचे आमिष दाखवून नंतर फसवल्याचा आरोपही केला आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 6 मार्च रोजी बलात्कार, मारहाण, गर्भपात करणे आणि धमकी देणे यासह अनेक कलमांखाली FIR दाखल झाली होती. तक्रारदार महिलेने सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत आपल्या आरोपांना पुष्टी दिली. पोलिसांना मुजफ्फरनगर येथून गर्भपाताशी संबंधित वैद्यकीय पुरावेही मिळाले आहेत.
काय घडले होते?
ही घटना 18 फेब्रुवारी 2025 रोजी घडली, जेव्हा सनोजने पीडितेला नबी करीम येथील हॉटेल शिवामध्ये आणले होते. तक्रारीनुसार, या भेटीदरम्यान सनोजने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिला सोडून दिले. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली. दिल्ली हायकोर्टाने सनोजची जमानत याचिका फेटाळल्यानंतर त्याला अटक झाली. या प्रकरणाची चौकशी आधीपासूनच सुरू होती.
दरम्यान, मोनालिसाला चित्रपटात संधी देणारा सनोज मिश्रा आता गंभीर आरोपांमुळे अडचणीत सापडला आहे. या प्रकरणाने फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली असून, पोलिस आता या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत. सनोजच्या अटकेमुळे मोनालिसाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





