मटकाकिंग समीर कच्छीसह 46 जणांना मोक्का

सातारा – मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या 46 साथीदारांवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. मटका व्यवसाय, व्याजाने पैसे देऊन सावकारी करणे, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्यासाठी टोळीने अनेक कृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, चिट फंड कलमही या टोळीला लावण्यात आले आहे.
समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी याच्यावर दि. 19 फेब्रुवारी रोजी मोळाचा ओढा (सातारा) येथील त्याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी एकूण 16 लाख 26 हजार 70 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला 22 साथीदारांसोबत ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर संशयित समीर कच्छीने त्याच्या साथीदारांमार्फत मटका जुगार सारखे अवैध धंदे चालवून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. समीर कच्छीने गैरमार्गाने गोळा केलेला हा पैसा सामान्य कुटुंबातील गरजू लोकांना बेकायदेशीर व्याजाने देऊन त्याद्वारे सावकारी केली. यातूनच काही जणांची पिळवणूक करत मारहाण केल्याचे समोर आले. कच्छी याच्यावर सावकारीची तक्रार आल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला. अवघ्या दोन दिवसांत मटका व सावकारीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाच्या कक्षा आणखी रुंदावल्या व मटका प्रकरणी थेट त्याची लिंक गोवा राज्यापर्यंत असल्याचे समोर आले. सातारा पोलिसांचे एक पथक तयार करुन गोवा राज्यातूनही मटका बहाद्दर पकडण्यात आले.
यावेळी पोलिसांनी गोवा येथून संशयितांच्या ताब्यातील 1 लाख 39 हजार 100 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. तब्बल 44 संशयित आरोपींची धरपकड झाल्यानंतर गुन्ह्याची तीव्रता ओळखून तपासाचा फास आवळण्यात आला. संशयित भिशी चालवून पैशांची देवाणघेवाण करत गैरमार्गाने तेच पैसे गुुंतवून अवैध धंदे करत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे चिट फंडचे कलमही संशयितांवर लावण्यात आले. मटका, सावकारी, चिटफंड या सर्वांचा प्रस्ताव तयार करुन तो कोल्हापूर आयजी कार्यालयाला पाठवला असता त्यालाही मंजुरी मिळाली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातारा पोलिसांनी मटका किंग समीर कच्छी याला एकामागून एक धक्के दिले. अद्याप याचा तपास सुरू आहे. संशयित वाढण्याची शक्यताही आहे. यामुळे कोणाचा नंबर लागणार, नेमका कोणाचा प्रत्यक्ष सहभाग आहे, साताऱ्यातील मटका, जुगाराची पाळेमुळे आणखी कोणत्या जिल्ह्यात, राज्यात आहेत का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसपींची रेकॉर्डब्रेक कामगिरी
एसपी समीर शेख यांनी केलेली ही कारवाई रेकॉर्डब्रेक ठरली आहे. साताऱ्यात केलेल्या कारवाईची पाळेमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश, गोवा या राज्यांत तर 6 जिल्ह्यांमध्ये असल्याचे समोर आले आहे. संशयितांमध्ये साहिल उर्फ भैय्या शमीम उर्फ समीर शेख (वय 19), अमर पवार, धनंजय कदम, अश्विन माने, नासिरहुसेन शेख, सलीम खान, शकील सय्यद, राजेश कदम, विकास चव्हाण, संतोष माने, अक्षय सोनावणे, गजानन इरकल, किशोर साळुंखे, असद सय्यद, असिफ खान, संतोष गुरव, प्रकाश बोभाटे, श्रीकांत पाटील, विपुल जाधव, राजेंद्र उर्फ राहुल निंबाळकर (सर्व रा. सातारा परिसर व जिल्हा), विष्णू सोनटक्के (रा. इचलकरंजी जि.कोल्हापूर), शिवराम नारायण सुवर्णा (रा. मेंगलोर, कर्नाटक), नरेंद्र तायडे, सुमेध तायडे, गजानन तायडे, सुमेध अवचार, पुरुषोत्तम रोजतकार (सर्व रा. जि. अकोला), यशवंत नायक (रा. गुजरात), अजय इंगोले, प्रतीक मुन, गजानन कणसे, शुभम राठोड, संतोष महाजन, सचिन खिची (सर्व रा.यवतमाळ जिल्हा), राजन कुमार (उत्तरप्रदेश), जयप्रकाश जयस्वाल (रा.ठाणे), अनिल मुंदडा (रा. औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहेत.





